कोलंबो -श्रीलंकेतील अध्यक्षीय निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले आहेत. यावेळी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक मतदारांचे मत हे महत्त्वाचे ठरणार आहे. श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येपैकी सात टक्के लोक हे ख्रिश्चन आहेत. एप्रिलमध्ये इस्टर संडे दिवशी सेंट अँथनी चर्चवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २५०हून अधिक लोकांचा बळी गेला होता. यामधील दहशतवाद्यांचा अजूनही तपास लागला नाही. त्यामुळे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ख्रिश्चन समाजाचे मत कोणाला मिळेल, हे येणारा काळच ठरवेल.
श्रीलंकेतील ख्रिश्चन समुदायाच्या मनात नक्की काय सुरु आहे, हे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'चे मुख्य संपादक निशांत शर्मा यांनी सेंट अँथनी चर्चचे फादर ज्यूड फर्नांडो यांची मुलाखत घेतली आहे.
या प्रकरणातील चौकशीच्या कारवाईवर निराश असलेले फादर फर्नांडो म्हणतात, आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहोत. हा हल्ला कोणी आणि का केला हे शोधून काढणे गरजेचे आहे. आम्हाला न्याय मिळायला हवा. हे प्रकरण ताजे असताना, तपासासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, त्यांचा अहवाल समाधानकारक नव्हता. त्यामुळे आता पुन्हा नवीन समितीची स्थापना करण्यात आली आहे. आम्हाला न्याय हवा आहे, त्यामुळे आम्ही चौकशी समितीला सर्वेतोपरी सहकार्य करत आहोत.
निवडणुकींबाबत बोलताना फर्नांडो यांनी स्पष्ट केले आहे, की ख्रिश्चन समुदायाचा कोणत्याही पक्षाकडे विशेष असा कल नाही. आम्ही कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देत नाही. मात्र, मतदान करणे आवश्यक असल्याने, चर्चमार्फत लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. श्रीलंकेमधील ही पहिलीच निवडणूक नाही. मतदार स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात, आणि ते त्यादृष्टीने मतदान करतील.