नवी दिल्ली -अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ भारत आणि श्रीलंका दौऱ्यानंतर मालदीवला गेले आहेत. इंडो पॅसिफिक आणि आशिया खंडात चीनच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी अमेरिकेने आघाडी उघडली आहे. अमेरिका-मालदीव संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न पॉम्पिओ करणार आहेत. दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये सागरी सुरक्षेवर महत्त्वाची चर्चा होणार आहे.
तीस वर्षात परराष्ट्र मंत्र्यांचा पहिला मालदीव दौरा
'तीन दशकात पहिल्यांदाच परराष्ट्र मंत्री या नात्याने मालदीवला भेट देताना आनंद होत आहे. दोन्ही देशांतील संबंध मजबूत होतील, अशी आशा व्यक्त करतो, असे ट्विट पॉम्पिओ यांनी केले आहे. चीनने आशिया खंडातील लहान देशांना आर्थिक मदत करून वर्चस्व स्थापन केले आहे. त्यामुळे आशिया खंडातील देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अमेरिकेने लहान देशांकडे लक्ष वळवले आहे.
मालदीव आणि अमेरिकेत सागरी सुरक्षा, दहशतवाद यासह इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आहे. या भेटीतून दोन्ही देशांतील संबंध आणखी घनिष्ट होतील, असे अमेरिकेच्या परराष्ट्र कार्यालयाने अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे.
भारत-अमेरिका लष्करी सहकार्य
"इंडो-अमेरिका बेसिक एक्स्चेंज अॅन्ड कॉ-ऑपरेशन एग्रीमेंट"(BECA) या करारावर भारत-अमेरिकेने सह्या केल्या आहेत. करारावर सह्या केल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्त्वाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. 'महत्त्वाच्या विषयावर आम्ही सखोल चर्चा केली. बेका करारावर सह्या होणे ही मोठी घटना आहे. दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढत आहे. संयुक्तरित्या लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आम्ही काही प्रकल्प निश्चित केले आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी बैठकीत आम्ही निर्धार केला, असे सिंह म्हणाले. या करारानंतर चीनचा तिळपापड झाला आहे. भारत भेटीनंतर अमेरिकेने आशियातील छोट्या देशांशी संबंध सुरधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.