बीजिंग:चीनमधील काही प्राणीप्रेमी नागरिकांनी एक पेंगोलीनला(खवल्या मांजरासारखा प्राणी) जंगलात सोडून दिले. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात एका मच्छीमार व्यक्तीला हे पेंगोलीन सापडले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर काही प्राणीप्रेमींनी त्याची सुटका करुन त्याला जंगलात सोडून दिले.
दिवसेंदिवस चीनमध्ये पेंगोलीनची संख्या कमी होत आहे. याबाबत चीनी सरकारने पेंगोलीनला संरक्षण देणारा कायदाही तयार केला आहे. त्यामुळे पेंगोलीनला जीवनदान दिले गेले ही एक सकारात्मक बाब आहे. मात्र, अद्यापही या प्राण्याची कमी होणारी संख्या चिंताजनक आहे, असे मत चीन जैवविविधता संवर्धन आणि ग्रीन डेव्हलपमेंट फंडचे सरचिटणीस झो जिनफेंग यांनी व्यक्त केले.
पेंगोलीनची वैद्यकीय तपासणी करुन त्याला जंगलात सोडण्यात आले झेजियांगमध्ये गेल्या वर्षी अधिकाऱ्यांनी 18 तस्करांना अटक केली होती. त्यांच्याकडून पेंगोलीनचे २३.१ टन खवले जप्त करण्यात आले होते. अभ्यासकांच्या माहितीनुसार इतक्या मोठ्या प्रमाणात खवले मिळवण्यासाठी सुमारे 50 प्राण्यांचा वापर केला गेला असेल.
प्राणीप्रेमींना मच्छिमाराकडील पेंगोलीनबाबत माहिती मिळताच त्यांनी त्याच्या वाहनाची तपासणी केली. माशांचे कॅरेट उघडताच त्यातून एक फुट लांबीचे पेंगोलीन बाहेर पडले. त्याची वैद्यकीय तपासणी करुन त्याला जंगलात सोडण्यात आले. अशा प्रकारे अनेक पेंगोलीनला वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे पेंगोलीन वाचवण्यारा कार्यकर्ता झोऊ याने सांगितले.
पेंगोलीनच्या खवल्यांना चीनमधील आयुर्वेदिक औषधांमध्ये विशेष महत्त्व आहे. त्यापासून तयार केलेले जेवणही पौष्टीक आणि रुचकर मानले जाते. त्यामुळे गेली कित्येक वर्षे तस्कर आफ्रिका, पूर्व आशिया आणि प्रत्यक्ष चीनमध्ये पेंगोलीनची शिकार आणि खवल्यांची अवैध विक्री करतात. गेल्या वर्षभरात बेल्जियम, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, फिलिपिन्स यासारख्या अनेक देशांमधून या पेंगोलीनचे खवले जप्त करण्यात आले आहेत.
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाव्हायरस बहुधा वटवाघळांपासून पेंगोलीनसारख्या प्राण्यांच्या मदतीने मनुष्यामध्ये संक्रमीत झाला असावा. त्यामुळेच चीन सरकारने तत्काळ यांच्या वैध आणि अवैध विक्रीवर बंदी घातली. त्यानंतर वन्य प्राण्यांच्या तस्करीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती देखील करण्यात आली, अशी माहिती झोऊ यांनी दिली.