वॉशिंग्टन - दोन भारतीयांना दहशतवादी ठरवण्याचा पाकिस्तानचा कट, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने उधळून लावला आहे. दहशतवाद विरोधी विशेष कारवाई १२६७च्या अंतर्गत पाकिस्तान हे करु पाहत होते. मात्र, आपल्या खोट्या दाव्यावर पुरेसे पुरावे दाखवणे पाकिस्तानला शक्य झाले नाही. संयुक्त राष्ट्रांमधील देशाचे कायमस्वरुपी प्रतिनिधी असणारे टी. एस. त्रिमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
अंगारा अप्पाजी आणि गोविंद पटनाईक या दोन भारतीयांना दहशतवादी सिद्ध करण्याचा डाव पाकिस्तानने रचला होता. यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील १२६७ दहशतवाद विरोधी समितीपुढे याचिका दाखल केली होती. यावेळी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांसमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांनी पाकिस्तानला आपल्या दाव्याला सिद्ध करणारे पुरावे सादर करण्यास सांगितले. मात्र, पाकिस्तानला असे कोणतेही पुरावे सुरक्षा परिषदेसमोर सादर न करता आल्यामुळे, त्यांची याचिका रद्द करण्यात आली.