बीजींग - चीनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणणार नसल्याचे पाकिस्तान सरकारने जाहीर केले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असताना आपले सरकार आपल्यासाठी काहीच करत नाही हे पाहून चीनमधील पाकिस्तानी विद्यार्थी संतापले आहेत.
नायला इनायत या पाकिस्तानी पत्रकाराने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय विद्यार्थी बसमध्ये बसताना दिसून येत आहेत. एका पाकिस्तानी विद्यार्थ्याने या व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे. यामध्ये तो विद्यार्थी भारत आणि बांगलादेशचे सरकार आपापल्या विद्यार्थ्यांना इथून घेऊन जात आहे, मात्र पाकिस्तान सरकार मात्र आमच्यासाठी काहीच करत नसल्याचे उद्विग्नपणे सांगत आहे.
पाकिस्तान सरकारला आमची अजिबात काळजी नाही, आम्ही इथे जीवंत आहोत की मेलो आहोत, आम्हाला विषाणूचा संसर्ग झालाय किंवा नाही झाला याबाबत सरकारला काहीही घेणे देणे नाही. ना सरकार आम्हाला इथून मायदेशी नेईल, ना आम्हाला कोणत्या सुविधा पुरवणार. 'शेम ऑन यू पाकिस्तान सरकार', भारताकडून तुम्ही काहीतरी शिका, असेही हा विद्यार्थी म्हणत आहे.
दरम्यान, "आम्हाला सध्या असे वाटते, की जे चीनमध्ये आहेत, त्यांनी चीनमध्ये राहण्यातच त्यांचे आणि देशाचे हित आहे. जागतिक आरोग्य संघटना हेच सांगत आहे, शिवाय चीनही हेच सांगत आहे. या संकटाच्या वेळी आम्ही चीनसोबत उभे आहोत. आमचाही चीनला दुजोरा आहे. त्यामुळे, चीनमधील पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार नाही." असे पाकिस्तानी पंतप्रधानांचे विशेष आरोग्य सहाय्यक जफर मिर्जा यांनी स्पष्ट केले होते.
हेही वाचा : कोरोना विषाणू : केरळात 'कोरोना'चा दुसरा रुग्ण