नवी दिल्ली - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील जामीन याचिकेवर सुनावणीपूर्वी नवाज यांची प्रकृती खालवली. त्यामुळे त्यांच्यावर लाहोर सर्व्हिस रुग्णालयात उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून नवाजती प्रकृती खालावली असून त्यांच्या प्लेटलेट्स संख्या कमी झाल्याचे समजते.
डॉक्टरांनी आवश्यक ते उपचार केले असून सध्यस्थितीत नवाज यांची स्थिती स्थिर असल्याचे समजते. नवाज यांची प्रकृती बिघडल्याने, नवाज यांचे बंधू शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान इमरान खान यांच्यावर निशाना साधला आहे. नवाज यांची काळजी व्यवस्थित घेतली जात नाही. जर नवाज यांना काही झाल्यास त्याला जबाबदार इमारान असतील, असे शहबाज शरीफ यांनी सांगितलं आहे.