नवी दिल्ली - मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरारवर मार खाल्ला आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तान आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) करड्या यादीतच (ग्रे लिस्ट) राहणार आहे. पैशांचा हा काळा धंदा थांबवण्यासाठी पाकिस्तानला आणखी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबत निर्णय झाला असून आज( शुक्रवार) याबाबत औपचारिक घोषणा होणार आहे.
पॅरिसमध्ये असलेले एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संघटना जगभरातील देशांच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवून असते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान एफटीएफ पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला करड्या यादीत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने आर्थिक गैरव्यवहार थांबवले नाही, तर काळ्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. जून २०१८ मध्ये पाकिस्तानला करड्या यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, समाधानकारक उपाययोजना न केल्यामुळे आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाकिस्तान करड्या यादीतच राहणार आहे.