इस्लामाबाद -आर्थिक कारवाई कार्यदलाने (FATF - फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला जून २०२० पर्यंत 'ग्रे लिस्ट'मध्येच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेकडून जगातील दहशतवादाला आर्थिक हातभार लावणाऱ्या देशांवर आणि वित्त संस्थांवर नजर ठेवण्यात येते.
पाकिस्तानला या मुदतीसोबतच लश्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणे बंद करत नाही, तोपर्यंत त्यांना अशा प्रकारच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. पॅरिसमध्ये या संस्थेच्या पूर्ण सत्रामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या दहशतवादी संघटनांना होणारा अर्थपुरवठा थांबवण्यासाठी एफएटीएफने २७ बाबींची यादी अंमलात आणण्यासाठी पाकिस्तानला दिली होती. मात्र, पाकने त्यातील फक्त काहीच केली आहेत. यामुळे जूनपर्यंत पाकने दहशतवादविरोधी कारवाईसाठी ठोस योजना बनवावी आणि कारवाई करावी, असा इशारा देण्यात आला आहे.