नवी दिल्ली - मनीलाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरारवर मार खाल्ला आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२१ च्या फेब्रुवारीपर्यंत पाकिस्तान आर्थिक कारवाई कृती दलाच्या (एफएटीएफ) करड्या यादीतच (ग्रे लिस्ट) राहणार आहे. पैशांचा हा काळा धंदा थांबवण्यासाठी पाकिस्तानला आणखी उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच आत्तापर्यंत केलेल्या उपाययोजना अपुऱ्या असून आणखी कठोर पावले उचलण्यास संघटनेने पाकिस्तानला सांगितले आहे.
करड्या यादीत राहिल्यामुळे आधीच कर्जाच्या खाईत लोटलेल्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरून कर्ज मिळवणे अवघड होऊन बसले आहे. भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाच्या प्रसारास कायमच विरोध केला आहे. भारतात झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग सिद्ध झाला आहे. मनीलाँड्रीग, शस्त्रास्त्रांची तस्करी, दहशतवाद्यांना पैसे आणि इतर साधनांचा पुरवठा पाकिस्तानकडून करण्यात येत असून अनेक दहशतवादी तळ पाकिस्तानात कार्यरत आहेत.
काळ्या आर्थिक धंद्यांवर लक्ष ठेवणारी FATF
पॅरिसमध्ये असलेले एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संघटना जगभरातील देशांच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवून असते. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला करड्या यादीत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने जर आर्थिक गैरव्यवहार थांबवले नाही, तर करड्या यादीतून काळ्या यादीत समावेश होण्याचीही शक्यता आहे. जून २०१८ मध्ये पाकिस्तानला करड्या यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, समाधानकारक उपाययोजना न केल्यामुळे आता पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत पाकिस्तान करड्या यादीतच राहणार आहे.
सुधारणा झाली नाही तर काळ्या यादीत जाण्याची शक्यता
जर काळ्या यादीमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला तर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून आर्थिक मदत मिळवणे पाकिस्तानला अवघड होवून बसणार आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद संबधी आर्थिक व्यवहार रोखण्यास पाकिस्तानने केलेल्या उपाययोजना समाधानकारक नसून अजून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे पाकिस्तानी माध्यमांनीही म्हटले आहे.
एफएटीफचे अध्यक्षपद चीनकडे असून चीन पाकिस्तानचा मित्र देश आहे. त्यामुळे पाकिस्तानवर भविष्यात आणखी काय कारवाई होणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी चीन, मलेशिया आणि टर्की देशांनी पाकिस्तानने दहशतवाद्यांना होणारा पैशाचा पुरवठा रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची प्रशंसा केली होती. मात्र, आंतराष्ट्रीय समुहापुढे पाकिस्तानला पुन्हा मान खाली घालावी लागली आहे.