इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मंगळवारी श्रीलंकेच्या दोन दिवसीय दौर्यावर रवाना झाले. श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या निमंत्रणावरून ते आज श्रीलंकेला रवाना झाले. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर श्रीलंकेतील हा त्यांचा पहिला दौरा आहे. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने दिलेल्या माहितीनुसार खान यांच्यासमवेत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ लंकेला रवाना झाले आहे. त्यात मंत्रिमंडळातील सदस्य आणि वरिष्ठ अधिकारीही आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांची घेणार भेट
पंतप्रधानांच्या कार्यक्रमात श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याशी भेटीचा समावेश आहे. पंतप्रधान व्यापार-गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी विषयांवर सहकार्याच्या सर्व क्षेत्रांसह शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेचे नेतृत्व करतील. विज्ञान आणि तंत्रज्ञानासह इतर विषयांवर दोन्ही देशांच्या क्षमतांवर चर्चा केली जाईल. द्विपक्षीय बाबींव्यतिरिक्त काही प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण होईल. दोन्ही देशांमधील संसदीय देवाणघेवाणांना चालना देण्यासाठी श्रीलंका-पाकिस्तान संसदीय मैत्री संघटनेच्या पुनर्रचनेचीही घोषणा केली जाईल, असे पाकिस्तान परराष्ट्र कार्यालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान इम्रान खान दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याच्या उद्देशाने संयुक्त 'व्यापार आणि गुंतवणूक परिषदे'मध्येही भाग घेतील, असेही निवेदनात म्हटले आहे.