लाहोर - दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या आरोपावरून पाकिस्तानमध्ये दाखल खटल्याला दहशतवादी हफीज सईदने न्यायालयात आव्हान दिले आहे. बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि अल-कायदा यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचे हफीज याने म्हटले आहे. आपल्याविरोधात दाखल करण्यात आलेली तक्रार निरर्थक असून ती रद्दबातल ठरवावी, अशा आशयाची याचिका त्याने न्यायालयात दाखल केली आहे.
'टेरर फंडिंग'संबंधी खटल्याला हफीज सईदचे आव्हान
सध्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने हफीज आणि त्याच्या १२ सहकाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यात त्याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याचाही समावेश आहे. मात्र, पाकिस्तानची हफीज सईदवरील कारवाई हा एक बनाव असल्याचे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी निर्बंध घातलेला लश्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दवा दहशतवादी संघटनांचा म्होरक्या हफीज पाकिस्तानात खुलेआम वावरत आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी नंदनवन ठरत असल्याचा आरोप भारताकडून अनेक वर्षांपासून केला जात आहे. यासह सध्याच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकारने हफीज याच्यावर गुन्हा दाखल केला होता. पाकमधील पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकाने हफीज आणि त्याच्या १२ सहकाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यात त्याचा मेहुणा अब्दुल रेहमान मक्की याचाही समावेश आहे.
दरम्यान, पाकिस्तानची हफीज सईदवरील कारवाई हा एक बनाव असल्याचे भारताने म्हटले आहे. 'पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात करत असलेल्या कारवाईचे परीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांनी केलेल्या कारवाईचा पडताळणीयोग्य पुरावा, विश्वासार्हता आणि त्याची फिरवा-फिरवी करता येणार नाही या आधारावर हे परीक्षण झाले पाहिजे. पाकिस्तान त्यांच्या भूमीवरील दहशतवादी तळांवर अशा प्रकारची कारवाई करत आहे की, अनिच्छेने वरवर दिखाऊ कारवाई करत आहे हे पहावे लागेल. कारण, अशा प्रकारांत मोडेल, अशी कारवाई पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय समुदायाला हूल देण्याच्या उद्देशाने वारंवार केली जाते,' असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ४ जुलैला म्हटले होते.