नवी दिल्ली -भारत अमेरिका द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दिशेने राजधानी दिल्लीत काल महत्त्वाची घटना घडली. अमेरिकेचे संरक्षणमंत्री मार्क एस्पर आणि परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी पंतप्रधान मोदींसह भारताचे संरक्षणमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांशी सखोल चर्चा केली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचा सामरिक करार करण्यात आला. मात्र, यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भारत अमेरिका संरक्षण सहकार्य करारामुळे प्रादेशिक शांतता धोक्यात येईल, तसेच आशिया खंडात असमतोल निर्माण होईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
पाकिस्ताने बोलून दाखवली मनातली भीती
भारत-अमेरिकेत संरक्षण सहकार्य करार झाल्यानंतर पाकिस्ताने भीती व्यक्त केली आहे. 'बेका करारावर सह्या झाल्या असून याची पाकिस्तानने दखल घेतली आहे. भारताला लष्करी हार्डवेअर(साहित्य), तंत्रज्ञान आणि संसाधने दिल्यामुळे दक्षिण आशिया खंडात सामरिक असमतोल निर्माण होईल. ही भीती पाकिस्ताना वारंवार मांडत आहे. भारत मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक शस्त्रे खरेदी करत आहे. तसेच आण्विक शस्त्रांची संख्याही वाढवत आहे. भारताच्या या निर्णयाने प्रादेशिक असमतोल होत आहे', असे अधिकृत वक्तव्य पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे
बेका कायद्यामुळे पाकिस्तानच्या पोटात गोळा
"इंडो-अमेरिका बेसिक एक्स्चेंज अॅन्ड कॉ-ऑपरेशन एग्रीमेंट"(BECA) या करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही देशात सॅटेलाइट छायाचित्रे, गोपनीय माहिती, जिओ स्पॅटिअल इंटेलिजन्स (पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टी, स्थान, वस्तू यांची गोपनीय माहिती), नकाशे या माहितीचे आदान-प्रदान होणार आहे. याचा भारताला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषत: भारताची संरक्षण सिद्धता वाढणार आहे. या बैठकीकडे चीन आणि पाकिस्तान बारीक लक्ष ठेवून होता. संरक्षण करार यशस्वी झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तान दोघांनीही गरळ ओकली आहे. लष्करी तंत्रज्ञानात भारत आधीच पाकिस्तानच्या पुढे आहे. त्यात अमेरिकेने भारताला तंत्रज्ञान दिल्यानंतर भारत आणखी सक्षम होणार आहे. पाकिस्तान आणि भारतामध्ये काश्मीरवरून स्वातंत्र्यापासून वाद सुरू आहेत. दोघांमध्ये तीनदा युद्धही झाले आहे. त्यामुळे भारताबरोबर युद्ध करण्याची वेळ आली तर हार पत्करावी लागेल, ही भीती पाकिस्तानला आहे.
स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व राखण्यावर नेत्यांचे एकमत
भारत आणि अमेरिकेत परराष्ट्रमंत्री व संरक्षणमंत्री स्तरावरील ही तिसरी बैठक होती. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी माईक पॉम्पिओ आणि मार्क एस्पर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी मोदींशी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही चर्चा केली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषदही घेण्यात आली. चीनचा जगाला धोका लक्षात घेता स्वातंत्र्य, सार्वभौमत्व दोन्ही देशांचे अबाधित राखण्यावर नेत्यांचे एकमत झाले.
भारत-अमेरिका लष्करी सहकार्य
बेका करारावर सह्या केल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी प्रादेशिक एकात्मता आणि सार्वभौमत्त्वाबद्दल महत्त्वाचे वक्तव्य केले. 'महत्त्वाच्या विषयावर आम्ही सखोल चर्चा केली. बेका करारावर सह्या होणे ही मोठी घटना आहे. दोन्ही देशांतील लष्करी सहकार्य वाढत आहे. संयुक्तरित्या लष्करी साहित्य तयार करण्यासाठी आम्ही काही प्रकल्प निश्चित केले आहेत. इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी बैठकीत आम्ही निर्धार केला, असे सिंह म्हणाले.