महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'पाकिस्तानला बलुची लोक नको, त्यांची जमीन आणि साधनसंपत्ती हवी आहे'

करिमा या बलोच विद्यार्थी संघटना 'आझाद'च्या माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही माहिती दिली. 'येथील साधनसंपत्ती आणि लोकांचे शोषण आणि स्वातंत्र्य चळवळ चालू असलेल्या या प्रदेशाचे भौगोलिक महत्त्व यांचा वापर करणे हेच त्यांचे (पाकिस्तानचे) धोरण आहे,' असे त्यांनी सांगितले.

करिमा बलोच

By

Published : May 7, 2019, 12:15 PM IST

जिनिव्हा - 'पाकिस्तान बलुची लोकांना बलुस्तानमधून संपवत आहे आणि त्यांची साधनसंपत्ती हडप करत आहे,' असा आरोप बलुची राजकीय कार्यकर्त्या करिमा बलोच यांनी केला आहे. 'बलुचिस्तानचे भौगोलिक महत्त्व आणि तेथील नैसर्गिक संपन्नता पाकिस्तानला दिसत आहे. पाकिस्तान येथील जमीन हडप करण्याची भाषा करत आहे. त्यांना बलुची लोक नको आहेत. त्यांची संपत्ती हवी आहे,' असे त्या म्हणाल्या.

करिमा या बलोच विद्यार्थी संघटना 'आझाद'च्या माजी अध्यक्ष आहेत. त्यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही माहिती दिली. 'येथील साधनसंपत्ती आणि लोकांचे शोषण आणि स्वातंत्र्य चळवळ चालू असलेल्या या प्रदेशाचे भौगोलिक महत्त्व यांचा वापर करणे हेच त्यांचे (पाकिस्तानचे) धोरण आहे,' असे त्यांनी सांगितले.

बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत आहे. येथे नैसर्गिक साधनसंपत्तीसह सोने, तांबे, तेल, किमती खडे, क्रोमाईट आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत. येथील किनारपट्टीलगत महासागर असून होर्मुझच्या सामुद्रधुनीसारखे जगातील महत्त्वाचे जलवाहतुकीचे मार्ग आहेत. इतकी संपन्नता असूनही बलुचिस्तानचे लोक रोजगार, चांगल्या दर्जाचे शिक्षण आणि पिण्याचे स्वच्छ पाणी यापासून वंचित आहेत. येथील लोक अनेक दशकांपासून पाकिस्तानशी युद्ध सुरू आहे. मात्र, त्यांना देशद्रोही किंवा कट्टरतावादी म्हटले जाते.

'आमच्या हक्कांसाठी आवाज उठवणे ही कट्टरता असेल, तर आम्ही कट्टरतावादी आहोत. बळाचा वापर करून आमच्या भूभागावर कब्जा करण्यात आला आहे. विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तान काश्मीरी लोकांच्या स्वातंत्र्याच्या गोष्टी करत असतो. तिथे पाकिस्तान काश्मीरींवर का बरे टीका करत नाही? आम्हाला काहीह म्हटले तरी आम्ही आमचा संघर्ष थांबवणार नाही,' असे करिमा यांनी म्हटले आहे.

अब्जावधी डॉलर्सचा चीन-पाकिस्तान कॉरिडॉर प्रोजेक्ट (सीपीईसी) सुरू झाल्यापासून बलुची लोकांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. पाक लष्कराने बलुचिस्तानातील मार्ग चीनला मोकळा करून देण्यासाठी येथे कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. चीनने येथील ग्वादर बंदरावर खोल समुद्रात संरक्षण योजनेचा भाग म्हणून विमानतळ, रडार, नाविकतळ, इत्यादींची कायम स्वरूपी बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला आहे. मात्र, हे सर्व आशिया आणि युरोपमधील व्यापार वाढवण्यासाठी असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जाते.

पाकिस्तानात हरवलेल्या व्यक्तींविषयी कोणीही ऐकून घेत नाही. त्यांच्या कुटुंबीयांवर अत्याचार केले जातात. लष्कराकडून येथील निष्पाप नागरिकांचे दिवसाढवळ्या अपहरण केले जाते. ते न्यायालयासमोरही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. देशातील कायदेव्यवस्था कमकुवत आणि पाक लष्कर आणि गुप्तचर विभाग शक्तिशाली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details