महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

दहशतवादाला खतपाणी घालणारा पाक एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्येच

मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्यावर नजर ठेवणारी फायनान्शियल अ‌ॅक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) पाकिस्तानला दिलासा मिळालेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्येच राहील.

FATF-Pakistan
एफएटीएफ-पाकिस्तान

By

Published : Jun 26, 2021, 11:44 AM IST

इस्लामाबाद - मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवणाऱ्या पाकिस्तानने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरारवर मार खाल्ला आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी वित्तपुरवठ्यावर नजर ठेवणारी फायनान्शियल अ‌ॅक्शन टास्क फोर्सकडून (एफएटीएफ) पाकिस्तानला दिलासा मिळालेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्येच राहील. पाकिस्तानवर नजर राहील. पाकिस्तानने 27 पैकी 26 असाईनमेंट्स पूर्ण केल्या आहेत. मात्र, दहशतवाद्यांवर कारवाई करणे आणि त्यांना शिक्षा देण्यात पाकिस्तान अपयशी ठरला आहे, असे एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेअर यांनी सांगितले.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नांबद्दलही एफएटीएफचे अध्यक्ष मार्कस प्लेअर यांनी पाकिस्तानचे कौतुकही केले. यावर्षी ऑक्टोबरमध्ये पुन्हा पाकिस्तानच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल.

मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याविरोधात पुरेशी पावले उचलण्यात अपयशी ठरल्यामुळे जून 2018 मध्ये पाकिस्तानला 'ग्रे लिस्ट'मध्ये टाकले होते. यानंतर, पाकिस्तानला 27 कलमी कृती आराखडा देण्यात आला. त्यानंतर ऑक्टोबर 2018 आणि फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या एफएटीएफ बैठकीत पाकिस्तानच्या प्रगती अहवालाचा आढावा घेण्यात आला. एफएटीएफच्या शिफारशींवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानवर नामुश्की ओढवली आहे.

पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मध्ये असून वाईट परिस्थितीला सामोरे जात आहे. पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवरही याचा वाईट परिणाम होतोय. या यादीमध्ये असल्याने, जागतिक बँक, आयएमएफ आणि युरोपियन युनियनकडून आर्थिक मदत मिळविण्यात अडचणी येत आहेत. यासह, इतर देशांमधूनही आर्थिक मदत उपलब्ध होत नाही.

तर पाकचा तर काळ्या यादीत समावेश -

पॅरिसमध्ये असलेले एफएटीएफ ही आंतरराष्ट्रीय संघटना जगभरातील देशांच्या आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवून असते. मागील काही दिवसांपासून पाकिस्तान एफटीएफ पाकिस्तानवर नजर ठेवून आहे. मनी लाँड्रीग आणि दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याच्या आर्थिक व्यवहारांमुळे पाकिस्तानला करड्या यादीत ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानने आर्थिक गैरव्यवहार थांबवले नाही, तर काळ्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2019 आणि फेब्रुवारी 2020 अशा दोन्ही वेळेस पाकिस्तान काळ्या यादीत जाण्यापासून बचावला आहे. कारण, चीन, मलेशिया आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याविरोधात मतदान केले होते. अद्यापही पाकिस्तानच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.

काय आहे एफएटीएफ?

आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक असलेल्या मनी लाँडरिंग, दहशतवादास आर्थिक उत्तेजन आणि इतर घटकांविरोधात कायदेशीर, नियामक आणि कार्यान्वयन उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच मानके निश्चित करण्यासाठी 1989 साली एफएटीएफची स्थापना करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी एफएटीएफकडून फेब्रुवारी, जून आणि ऑक्टोबरमध्ये अशी तीन अधिवेशने भरवली जातात. यामध्ये नियंत्रणाखाली असलेल्या देशांकडून नियमांचे पालन होत आहे की नाही, यासंदर्भात चर्चा आणि निर्णय होतात. थोडक्यात, ही जागतिक समुदायापुढे मजबूत शिफारसी सादर करणारी धोरण निर्माती संस्था आहे. सध्या या संस्थेत 39 सदस्य (37 देश आणि दोन प्रादेशिक संस्था- युरोपियन कमिशन, आखाती समन्वय परिषद) आहेत.

हेही वाचा -'एफएटीएफ'ची पाकिस्तानसंदर्भातील बैठक 21 ते 23 ऑक्टोबरदरम्यान

हेही वाचा -'एफएटीएफ'ची पाकिस्तानसंदर्भातील बैठक

ABOUT THE AUTHOR

...view details