इस्लामाबाद - अमेरिकी पत्रकार डॅनियल पर्ल 2002 हत्या प्रकरणातील आरोपींना पुन्हा अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी पाकिस्तानमधील सिंध उच्च न्यायालयाने आरोपींची फाशी रद्द करत त्यांची सुटका केली होती. त्यानंतर सिंध प्रांतीय सरकारच्या आदेशानुसार पुन्हा मुख्य आरोपी अहमद ओमर सईद शेख,फहाद नसीम, सलमान साकीब आणि शेख आदिल यांना अटक केली आहे.
अमेरिकेच्या दक्षिण आणि मध्य आशियाचे विभागाचे सहाय्यक सचिव एलिस वेल्स यांनी पाकिस्तान न्यायलयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. पर्ल यांच्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करणे, म्हणजे दहशतवादाला बळी पडलेल्या प्रत्येका अपमान करण्यासारखे आहे. पर्ल यांच्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या. तसेच आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी सरकारी वकिलांकडून सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल करण्याचा निर्णयाचे त्यांनी स्वागतही केले.