वॉशिंग्टन डी. सी - पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाणाऱ्या अमेरिकेच्या विमानांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाणाऱ्या सर्व विमानांनी सावधानता बाळगावी, अशी नोटीस अमेरिकेने जाहीर केली आहे. पाकिस्तानी कट्टर आणि दहशतवादी गटांकडून हल्ला होण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेच्या दुतावासावर आंदोलकांनी हल्ला केला होता. त्या पार्श्ववभूमीवर अमेरिकेच्या 'फेडरल एव्हिएशन अॅडमिनीस्ट्रेशन'ने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -आण्विक प्रकल्पांवर हल्ला प्रतिबंध करारानुसार भारत-पाकमध्ये माहितीची देवाणघेवाण
एडव्हायजरीतून सावधानता बाळगण्याचा दिला इशारा
दहशतवादी आणि कट्टर संघटनांकडून अमेरिकेच्या विमानांना धोका आहे. त्यामुळे पाकिस्तानी हवाई हद्दीतून जाताना विमान चालकांनी काळजी घ्यावी. पाकिस्तानी दहशतवाद्यांकडे हाताने हाताळता येण्याजोगे म्हणजेच 'मॅन पोर्टेबल एअर डिफेन्स' सारखी क्षेपणास्त्रे आहेत. जे विमाने कमी उंचीवरून उडतात त्यांना जास्त धोका असल्याचेही अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. त्यामुळे सावधानता बाळगण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -सुदानमध्ये एका शिक्षकाच्या हत्येप्रकरणी २९ गुप्तचर अधिकाऱ्यांना मृत्यूदंड
बगदादमधील दुतावासावरील हल्ल्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला जबाबदार धरले आहे. ते म्हणाले, इराकमधील अमेरिकेच्या दुतावासावर इराणने हल्ला घडवून आणला. या आधी इराणला समर्थन देणाऱ्या एका गटावर अमेरिकेने हवाई हल्ला केला होता. यामध्ये २५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या विरोधात इराकमधील अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला झाला होता.