हैदराबाद : पाकिस्तानने महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जून 2020 रोजी शीख यात्रेकरुंसाठी ऐतिहासिक कॉरिडॉर पुन्हा खुले करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, भारताने करतारपूर कॉरिडॉर पुन्हा खुले करण्यास हिरवा कंदील दाखवण्यास स्पष्ट निरिच्छा दर्शवली आहे. कारण, सध्या दोन्ही देश कोरोना महामारीचा सामना करीत आहेत.
"जगभरातील प्रार्थनास्थळे खुली होत आहेत. पाकिस्तानदेखील करतारपूर साहिब कॉरिडॉर शीख यात्रेकरुंसाठी खुले करण्याची तयारी करीत आहे. महाराजा रणजीत सिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त 29 जून 2020 रोजी आम्ही हे कॉरिडॉर खुले करण्यास तयार आहोत, असा संदेश भारताला देऊ इच्छितो", असे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. मात्र, पाकिस्तान केवळ खोट्या सद्भावनेचे प्रदर्शन करीत आहे, असे भारताने म्हटले आहे.
"अवघ्या दोन दिवसांच्या सूचनेवर पाकिस्तान 29 जून रोजी करतारपूर कॉरिडॉर सुरु करण्याचा प्रस्ताव मांडत केवळ सद्भावनेचे मृगजळ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, द्विपक्षीय करारात असे नमूद करण्यात आले आहे की, प्रवास करण्याच्या सात दिवस अगोदर भारताने पाकिस्तानला माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी भारताला बऱ्यापैकी अगोदर नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याची गरज आहे", असे मत भारतीय अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी 9 नोव्हेंबर 2019 रोजी करतारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन केले होते. हे कॉरिडॉर अखेर बाबा गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला खुले करण्यात आले. भारतातील तसेच जगभरातील शीख यात्रेकरुंची इच्छा यानिमित्ताने पुर्ण झाली होती.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभुमीवर 16 मार्च रोजी हे कॉरिडॉर तात्पुरते बंद करण्यात आले होते. मात्र, कित्येक महिन्यांच्या लॉकडाऊनंततर जगभरातील काही प्रार्थनास्थळे हळूहळू सुरु करण्यात येत आहेत. "आरोग्यासंबंधी मार्गदर्शक तत्वांचे पालन होत आहे याची खात्री करण्यासाठी, कॉरिडॉर पुन्हा खुले करण्यास आवश्यक एसओपी निश्चित करण्यासाठी पाकिस्तानने भारताला निमंत्रण दिले आहे", असे वक्तव्य पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने केले आहे.