इस्लामाबाद : देशावर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या २६/११च्या हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रेहमान लख्वी याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने ही शिक्षा जाहीर केली आहे.
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे लख्वी..
झाकीउर लख्वी हा लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी न्यायालयाने शुक्रवारी निकाल देत लख्वीला १५ वर्षांची शिक्षा जाहीर केली. ६१ वर्षांचा लख्वी हा मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणात २०१५ पासून जामीनावर बाहेर होता. त्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवाद विरोधी पथकाने त्याला गेल्या शनिवारी अटक केली होती.
पंधरा वर्षांसाठी सक्तमजूरी..
लाहोरमधील दहशतवाद विरोधी न्यायालयाने (एटीसी) लख्वीला दहशतवादी कारवायांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी शिक्षा जाहीर केली आहे. यासोबतच, १९९७च्या दहशतवाद विरोधी कायद्याच्या विविध कलमांतर्गत त्याला १५ वर्षांची शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. पाच वर्षे सक्तमजूरी आणि एक लाख पाकिस्तानी रुपये दंड, अशी शिक्षा त्याला तीन वेळा देण्यात आली आहे. तसेच, दंड भरता न आल्यास, सहा-सहा महिन्यांसाठी पुन्हा तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरुप आहे.
एजाज अहमद बुट्टर या न्यायाधीशांनी हा निकाल दिला. यानंतर लख्वीला तुरुंगात पाठवण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लख्वीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत, आपल्याला नाहक या प्रकरणात गुंतवले जात असल्याचा आरोपही सुनावणीदरम्यान केला होता.
२६/११चा हल्ला..
२६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री अचानक सुरू झालेल्या गोळीबाराच्या आवाजाने मुंबई हादरली. २६/११ च्या या काळरात्री दहशतवाद्यांनी दोन हॉटेल, रेल्वे स्टेशन, रुग्णालय, ज्यूंचे प्रार्थनास्थळ छाबडा हाऊसवर हल्ला केला होता. देशाच्या आर्थिक राजधानीवरील हल्ल्याच्या कटू आठवणी आजही मुंबईकरांच्या स्मरणात आहेत. देशाच्या आर्थिक प्रगतीचे इंजिन मानले जाणाऱ्या मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे 197 नागरिक बळी पडले होते. तर सुमारे 600 नागरिक जखमी झाले होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलातील महत्त्वाचे अधिकारी दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत हुतात्मा झाले होते.
हेही वाचा :बदायूं बलात्कार प्रकरण : चंद्रमुखी देवींच्या वक्तव्यावर प्रियांका गांधी भडकल्या