इस्लामाबाद - पाकिस्तानने गुरुवारी गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा यशस्वी चाचणी केली. २९० किलोमीटरपर्यंत या क्षेपणास्त्राची मारक क्षमता आहे. क्षेपणास्त्राची चाचणी हा एक युद्ध अभ्यासाचा भाग असल्याचे पाकिस्तानी लष्काराकडून जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे.
पाककडून अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या 'गझनवी'ची यशस्वी चाचणी - गझनवी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र
पाकिस्तानने गुरुवारी गझनवी या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची पुन्हा एकदा यशस्वी चाचणी केली.

यापूर्वी आगस्ट 2019 मध्ये पाकिस्ताने या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. पाकिस्तानी लष्कराने या चाचणीचा ३० सेकंदाचा व्हिडिओ सुद्धा टि्वट केला होता. गझनवी क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणामागे भारतावर दबाव टाकण्याचा तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधून घेण्याच्या पाकिस्तानचा हेतू असू शकतो, असे बोलले जात आहे.
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धाचे इशारे दिले जात आहेत.