काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि कम्युनिस्ट पार्टीचे सह-अध्यक्ष पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांच्यात मंगळवारपासून पुन्हा चर्चांना सुरुवात झाली. त्यांच्यातील मतभेदांनंतर पक्षात फूट पडू नये म्हणून गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यात चर्चांच्या फेऱ्या होत आहेत.
शुक्रवारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज झालेली चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये पंतप्रधान ओलींचे भवितव्य ठरणार आहे.
यापूर्वी प्रचंड म्हणाले होते, की ते पक्षामध्ये फूट पडू नये यासाठी शक्य तितके प्रयत्न करतील. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जर पक्ष एकजूट नसेल, तर त्याचा परिणाम कोरोनाच्या लढाईवर होणार आहे. पक्षातील सदस्यांमध्ये मतभेद असणे सामान्य बाब आहे. त्यामुळे चर्चेतून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे ते म्हणाले होते.
भारतविरोधी वक्तव्यावरून पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा ही ठिकाणे नेपाळच्या राजकीय नकाशात सामील केल्यानंतर जो कट सुरू करण्यात आला, त्यात नेपाळी नेत्यांचाही समावेश होता. मला पदावरून हटवण्यासाठी भारत आणि नेपाळमध्ये कट रचण्यात आला आहे, असे ते म्हणाले होते.
तर, ओली यांनी भारताविरोधात केलेले विधान राजकीयदृष्टय़ा व राजनैतिक पातळीवर अयोग्य आहे, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रचंड यांनी म्हटले होते.