काबूल : एका देशाच्या सरकारचा पाडाव करून पूर्णपणे सत्ता मिळविलेला तालिबान दिशाहीनतेमुळे सैरभैर झाल्याची स्थिती सध्या बघायला मिळत आहे. देश चालविण्यासाठी कुठलेच धोरण किंवा योजना समोर नसल्याने माजी सरकारी अधिकाऱ्यांसमोर आर्जव करण्याची वेळ तालिबानवर ओढवल्याचे दिसत आहे. मात्र तालिबानच्या भितीने अनेक सरकारी अधिकारी भूमिगत झाले असून ते आता देशातून पलायनाच्या तयारीत असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे.
तालिबानचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भेटीला
अल-रेहमान हक्कानींच्या नेतृत्वातील तालिबानच्या एका शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सलोखा उच्चायुक्तालयाचे अध्यक्ष अब्दुल्ला अब्दुल्ला यांची भेट घेतली आणि काबुलच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तालिबान काम करेल असे आश्वासन त्यांना दिले. अब्दुल्ला यांनी स्वतःच्या ट्विटर खात्यावरून याची माहिती दिली. या बैठकीदरम्यान अब्दुल्लांनी स्वतःचे अधिकृत पद अधोरेखित करताना न्यायावर आधारीत स्वतंत्र आणि एकसंघ अफगाणिस्तानला समर्थन असल्याचे म्हटल्याचेही सांगितले. सामाजिक न्यायाच्या अभावामुळे देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय ऐक्य शक्य नसल्याचे इतिहासातून दिसून आल्याचे शिष्टमंडळाला त्यांनी सांगितले. यावेळी हक्कानी यांनी काबुलच्या जनतेला सुरक्षितता पुरविण्याचे आश्वासन देताना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदत आणि समर्थनाची मागणी केल्याचे अब्दुल्लांनी म्हटले आहे.
सरकार चालविण्यासाठी पैसे व कर्मचारी नसल्याची तालिबानची कबुली
अफगाणिस्तानवर पूर्ण नियंत्रण मिळविलेल्या तालिबानने गुरूवारी देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत अमेरिकेवर विजय मिळविल्याची घोषणा केली. याचवेळी देश चालविण्यासाठी पैशांची तसेच सरकारी अधिकाऱ्यांची वानवा ही मोठी आव्हाने समोर असल्याचेही तालिबानने म्हटले आहे.
देश चालविण्यासाठी तालिबानकडे योजनाच नाही
देशाचे नेतृत्व कशा पद्धतीने केले जाईल याविषयी तालिबानने अजून काहीही स्पष्ट केलेले नाही. शरिया कायद्याचे पालन केले जाईल याव्यतिरिक्त तालिबानने देश चालविण्याविषयी काहीही स्पष्टपणे सांगितलेले नाही. सध्या तालिबानी अफगाण सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे. मात्र अतिशय अनिश्चिततेचा त्यांना सामना करावा लागत आहे.
सरकारी अधिकारी भूमिगत
तालिबानने सरकारी अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. मात्र अनेक अधिकारी भूमिगत झाले असून ते तालिबानपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्थानिक पत्रकारांनी म्हटले आहे. या परिस्थितीत अफगाणिस्तानच्या 9 अब्ज डॉलर्सच्या परदेशी ठेवींविषयीही अनिश्चितता निर्माण झाली आहे. या ठेवी अमेरिकेत आहेत.
मानवी संकट अधिक गडद
या सर्व परिस्थिती मानवी संकट अधिक गडद होण्याची भीती अफगाणिस्तानातील जागतिक अन्न उपक्रमाच्या प्रमुख मेरी एलेन मॅकग्रोर्टी यांनी व्यक्त केली आहे. अन्न आयातीच्या अडचणींशिवाय देशाच्या 40 टक्के भागात दुष्काळाने पिके नष्ट झाली आहे. अनेक नागरिक हे उद्यानांसारख्या खुल्या मैदानात वास्तव्यास आहेत. सध्या अफगाणिस्तानला मदतीची सर्वाधिक गरज आहे. आंतररराष्ट्रीय समुदायाने आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना भक्कम सहकार्य केले पाहिजे असे त्या म्हणाल्या.
तालिबानच्या गोळीबारात 5 ठार
अफगाणिस्तानच्या कुनार प्रांताची राजधानी असादाबादमध्ये तालिबानी बंडखोरांनी केलेल्या गोळीबारात गुरूवारी दोघांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानचा 102 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रध्वजासह रॅली काढणाऱया नागरिकांना लक्ष्य करत तालिबानी बंडखोरांनी गोळीबार केला होता. याच्या एकच दिवस आधी जलालाबादमध्ये झालेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला होता.
जलालाबादमध्ये हिंसाचारात 3 ठार
अफगाणिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जलालाबादमध्ये झालेल्या एका आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी तालिबानचा ध्वज काढून तिथे अफगाणिस्तानचा ध्वज फडकावला होता. यावेळी हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला. हिंसाचारानंतर तालिबानी प्रशासनाने खोस्ट प्रांतात 24 तासांच्या कर्फ्यूची घोषणा केली. दरम्यान, 19 ऑगस्ट 1919 मध्ये अफगाणिस्तान ब्रिटिशांच्या अधिपत्यातून मुक्त झाला होता.
स्वातंत्र्यदिनी मनात कैद्याची भावना
19 ऑगस्ट हा अफगाणिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. मात्र आता सरकारचा पाडाव झाला आहे. आता स्वातंत्र्याबद्दल काय बोलावे. लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले आहे. लोकांच्या मनात भीती आहे. स्वातंत्र्य दिनाला आमच्या मनात एखाद्या कैद्यासारखी भावना आहे असे मत माजी पत्रकार अख्तरबीर अख्तर यांनी व्यक्त केले आहे.
घनी यांनी व्हिडिओतून केले पलायनाचे समर्थन