काठमांडू : नेपाळच्या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी पंतप्रधान के. पी. ओलींचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे, आपले सरकार पाडण्यासाठी दिल्लीमध्ये बैठका होतात असा ओलींचा आरोप त्यांच्यावरच पलटताना दिसतो आहे.
पंतप्रधानांच्या निवसास्थानी आज सत्ताधारी पक्षाच्या स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी ओलींना रविवारी केलेल्या वक्तव्याबाबत फटकारले. भारत हा नेपाळचे सरकार उलथून टाकण्याचा कट रचत असल्याचे त्यांचे वक्तव्य हे राजकीयदृष्ट्या चुकीचे होतेच, मात्र ते द्विपक्षीय संबंध बिघडवणारेही होते. पंतप्रधानांनी केलेल्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे आपले शेजारील देशासोबतचे संबंध बिघडू शकतात असा इशारा दहल यांनी यावेळी दिला.
नेपाळमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दिल्लीत बैठका झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान ओली यांनी केले होते. नेपाळने राज्यघटना दुरुस्त केल्यामुळे दिल्लीत बैठका होत आहेत, अशी बातमी मिळत आहे. भारत नेपाळ सरकार उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला होता.