काठमांडू : नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे सह-अध्यक्ष पुष्पकमल दहल 'प्रचंड' यांची आज (रविवार) बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ओलींच्या राजीनाम्याबाबत किंवा एकूणच कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा या दोघांमध्ये चर्चा होणार आहे.
रविवारी सकाळी पंतप्रधान ओलींनी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर दहल हे ओलींच्या निवासस्थानी पोहोचले. याठिकाणी दोघांमध्ये पक्षात सुरू असलेल्या तणावाबाबत चर्चा झाली. संसदेच्या अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून या दोघांमध्ये पक्षातील तणाव निवळण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू आहेत.
३० जूनला झालेल्या पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत ओलींना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी ओलींना भारताबाबत केलेल्या वक्तव्याबाबत फटकारत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भारत हा नेपाळचे सरकार उलथून टाकण्याचा कट रचत असल्याचे त्यांचे वक्तव्य हे राजकीयदृष्ट्या चुकीचे होतेच, मात्र ते द्विपक्षीय संबंध बिघडवणारेही होते. पंतप्रधानांनी केलेल्या अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे आपले शेजारील देशासोबतचे संबंध बिघडू शकतात असा इशारा दहल यांनी यावेळी दिला होता.
दहल यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते माधव कुमार नेपाल, झालानाथ खनाल, पक्षाचे उपाध्यक्ष बामदेव गौतम आणि प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी पंतप्रधानांना आपल्या वक्तव्याबाबत पुरावे देण्याची मागणी केली होती. तसेच, ओलींनी राजीनामा देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
हेही वाचा :डब्ल्यूएचओने रुग्णांवरील हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचे ट्रायल थांबवले