नवी दिल्ली : "दहशतवाद ही जगासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांना दोषी ठरवून, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी इतर राष्ट्रांनी एकत्र यावे", असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्यक्त केले. ते १२व्या ब्रिक्स (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) परिषदेमध्ये बोलत होते. दहशतवादाच्या मुद्द्यावरुन त्यांनी पाकिस्तानवर नाव न घेता निशाणा साधला. 'जागतिक स्थिरता आणि सामायिक सुरक्षा ' हा या ब्रिक्स परिषदेचा विषय होता.
ब्रिक्स दहशतवाद विरोधी धोरण...
या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद रशियाकडे होते. रशियाच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स दहशतवाद विरोधी धोरणाला अंतिम स्वरुप देण्यात आले आहे, याचा आम्हाला आनंद आहे असे मोदी म्हणाले. दहशतवादाविरोधात हे एक मोठे यश असून, आपल्या अध्यक्षपदाच्या काळात भारत हे कार्य आणखी पुढे नेईल, अशी ग्वाही मोदींनी यावेळी बोलताना दिली.
'शेरपा' तयार करणार अहवाल...
यावेळी बोलताना मोदी म्हणाले, की २०२१ मध्ये ब्रिक्सला १५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आमचे 'शेरपा' हे ब्रिक्सच्या १५ वर्षांतील विविध निर्णय आणि त्यांच्या परिणामांबाबत एक अहवाल तयार करु शकतात, असे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.