बीजिंग :24 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाच्या शोधासाठी दुचाकीवरून तब्बल पाच लाख किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चीनमधील एका पित्याची अखेर त्याच्या मुलासोबत भेट झाली आहे. तब्बल 24 वर्षांनंतर या पित्याला त्याचा मुलगा सापडला असून एखाद्या चित्रपटातील कथानकाला साजेशा असणाऱ्या या घटनेची आंतरराष्ट्रीय माध्यमांत मोठी चर्चा होताना दिसत आहे.
काय आहे घटना?
चीनच्या शॅनडोंग प्रांतात राहणाऱ्या गुओ गांगतांग यांचा दोन वर्षीय मुलगा गुओ शिन्झेनचे 1997 मध्ये त्यांच्या घरासमोरून अपहरण झाले होते. यानंतर पोलीस तपासातही शिन्झेनचा शोध न लागल्यामुळे गुओ गांगतांग यांनी एकट्याने दुचाकीवरून प्रवास करत चीनच्या वेगवेगळ्या भागात जाऊन मुलाचा शोध घेतला होता. तब्बल पाच लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतरही त्यांना शिन्झेन सापडला नव्हता. अखेर चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने यावर्षीच्या जानेवारी महिन्यात राबविलेल्या ऑपरेशन तौनयुआनमुळे तब्बल 26 वर्षांनंतर तांगयांग यांची शिन्झेनसोबत पुनर्भेट शक्य झाली आहे.
1997 मध्ये झाले होते अपहरण
गुओ शिन्झेन दोन वर्षांचा असताना सप्टेंबर 1997 मध्ये मानव तस्करांनी लियाओचेंगमधील राहत्या घरासमोरून त्याचे अपहरण केले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका पुरूष आणि महिला संशयिताला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. या दोघांनी गुओ शिन्झेनचे शॅनडोंगमधून अपहरण करून हेनान प्रांतात त्याची विक्री केल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. शिन्झेनचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोठे प्रयत्न केले. यासाठी गुओ गांगतांगचे आणि त्याच्या पत्नीच्या रक्ताचे नमुनेही त्यांनी घेतले. मात्र त्यानंतरच्या तपासात त्याचा शोध लागू शकला नाही.
ऑपरेशन तौनयुआनमुळे झाली पुनर्भेट
या वर्षीच्या जानेवारी महिन्यात सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाने बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी देशभरात ऑपरेशन तौनयुआन अर्थात पुनर्भेट ही मोहिम राबविली. या मोहिमेत देशभरातून सुमारे 10 हजार लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून त्यांचे डिएनए जुळविण्यात आले. यातूनच हेनान प्रांतातल्या गुओ शिन्झेनचा डिएनए त्याच्या मूळ पालकांसोबत जुळला. या मोहिमेतूनच तब्बल 24 वर्षांनंतर गुओ गांगतांग यांची बेपत्ता मुलासोबत पुनर्भेट झाली आहे.