लंडन - नोबेल पारितोषिक विजेती आणि पाकिस्तानमधील शिक्षण हक्कासाठी लढा देणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझईने काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती तिने केली आहे.
हेही वाचा -जम्मू-काश्मीरबाबत नेहरूंचा दृष्टिकोन चुकीचा; सरदार पटेलांचा दृष्टिकोन योग्य - रविशंकर प्रसाद
गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी येथील शांततेसाठी प्रयत्न करावेत, काश्मीरी लोकांना काय वाटते, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत आणि मुलांना सुरक्षितरित्या शाळेत जाता आले पाहिजे, असे मलाला म्हणाली.