नवी दिल्ली - श्रीलंकेमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक १६ नोव्हेंबरला (उद्या) होऊ घातली आहे. श्रीलंकेतील ही ८वी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीत ३५ उमेदवार रिंगणात आहेत. यात कोणताही विद्यमान पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष किंवा विरोधी पक्षनेता निवडणूक लढवत नाही. शेजारी देश असल्याच्या कारणावरून येथील निवडणुकांना भारताच्या दृष्टीने महत्व आहे.
या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी गोताबाया राजपक्षे आणि सजीत प्रेमदासा हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. राजपक्षे हे श्रीलंका पोदुजन पेरमुना (एसएलपीपी) या पक्षाकडून तर प्रेमदासा युनायटेड नॅशनल पक्षाकडून (यूएनपी) निवडणूक लढवत आहेत. गोताबाया हे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे लहान बंधू आहेत. ही त्यांची जमेची बाजू. पण, लिट्टे या दहशतवादी संघटनेशी असलेला त्यांचा संबंध देशात चर्चीला गेला. या उलट प्रेमदासा यांची प्रतिमा स्वच्छ मानली जाते.
हेही वाचा -BRICS परिषद: दहशतवादामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं १ ट्रिलीयन डॉलरचं नुकसान - पंतप्रधान
निवडणुकीतले मुद्दे
एसएलपीपी आणि यूएनपी या दोन्ही पक्षांकडून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. दोघांकडूनही देशाची ढासळती अर्थव्यवस्था, राष्ट्रीय सुरक्षा, भ्रष्टाचार, धार्मिक ध्रुवीकरण अशा मुद्यांचा आधार घेतला जात आहे. पण, त्यातही राजपक्षेंच्या एसएलपीपीची मदार बौद्ध सिंहली मतांवर आहे. तर प्रेमदासांचा यूएनपी दिवंगत राष्ट्राध्यक्ष रणसिंगे प्रेमदासा यांच्या नावावर मते मागत आहे.