इस्लामाबाद -पाकिस्तानने भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी भारताशी समझोता करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैसल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत 'भारतीय हेर' कुलभूषण यांच्या प्रकरणी संविधानानुसार पावले उचलली जाणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी समझोत्याचा प्रश्नच नसल्याचे पाकने म्हटले आहे.
काही पाकिस्तानी मीडियामध्ये अशा आशयाचा अहवाल प्रसिद्ध झाला होता की, भारतीय नागरिक कुलभूषण यांना सिव्हिल कोर्टात अपील करण्याचा अधिकार देण्यासाठी पाकिस्तान आपल्या लष्करी कायद्यात संशोधन करणार आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने याचा साफ इन्कार केला आहे. जाधव यांच्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय न्यायालय (आयसीजे)च्या निर्णयासंदर्भात पाकिस्तानी कायद्यात बदल होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.