इस्लामाबाद (पाकिस्तान) -पाकिस्तानच्या तुरुगांत अटकेत असलेले माजी भारतीय सैनिक कुलभूषण जाधव ( Kulbhushan Jadhav Case ) प्रकरणी वकिलांच्या नियुक्तीवर निर्णय घेण्यासाठी भारताला आणखी एक संधी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ( Islamabad High Court ) हे आदेश दिले आहेत. ( Islamabad High Court on Kulbhushan Jadhav Case )
पाकिस्तानी माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे, असे ट्विट एएनआय या वृत्तसंस्थेने दिले. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपल्या निर्णयात जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेविरुद्ध अपील आणि सुनावणीची सधी देण्याचाही आदेश दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान, जाधव यांची बाजू मांडण्यासाठी एका वकीलाच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, भारताला वकिलाची नियुक्ती करण्याच्या निर्णयासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने आणखी एक संधी देण्याचे आदेश दिले आहेत.
काय आहे कुलभूषण जाधव प्रकरण?
कुलभूषण जाधव हे मुंबईतील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर जाधव यांचे पुत्र आहेत. सुधीर जाधव हे पोलीस दलातून निवृत्त झाले आहेत. तर 51 वर्षांचे कुलभूषण जाधव हे नौदलातील अधिकारी होते. 14 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती स्वीकारली. 2003 मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारत सरकारने केला होता. दरम्यान कुलभूषण जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तान येथून पाकमधील गुप्तचर यंत्रणांनी अटक केल्याचे पाकिस्तानने सांगितले. कुलभूषण जाधव नौदलातील कमांडिंग ऑफिसर दर्जाचे अधिकारी आहेत. ते भारतातील गुप्तचर यंत्रणेसाठी काम करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. तेव्हापासून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आहे.
हेही वाचा -Russia-Ukraine war LIVE Updates : अणू उर्जा प्रकल्प गोळीबारामुळे आगीच्या भक्ष्यस्थानी, होऊ शकतो चर्नोबिलपेक्षा 10 पट मोठा विध्वंस, युद्धाचे प्रत्येक अपडेट फक्त एका क्लिकवर
तसेच कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय परस्पर फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने याप्रकरणी पाकिस्तानची एकतर्फी भूमिका तसेच कारवाई करण्यावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये भारतीय वकील हरीष साळवे यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खोडून काढले होते. १७ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आणली होती. याचबरोबर त्यांनी जाधव यांना राजकीय मदत देण्याचे आदेशही पाकिस्तानला दिले होते.