जकार्ता - शनिवारी इंडोनेशियातील जकार्ता येथून श्रीविजय एअर फ्लाइटचे विमान बेपत्ता झाले होते. हे विमान पाण्यात कोसळले असल्याची माहिती समोर आली होती. जकार्ता बंदराच्या परिसरात या विमानाचे काही अवशेष सापडल्याची माहिती इंडोनेशियन अधिकाऱ्यांनी दिली.
इंडोनेशियातील जकार्ता येथून बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले विमानाचे अवशेष आणि मानवी अवयव सापडले -
शनिवारी इंडोनेशियातील जकार्ता येथून ५९ प्रवाशांना घेऊन विमानाने टेक-ऑफ केले होते. मात्र, त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. हे विमान जकार्तापासून जवळ असलेल्या परिसरात कोसळल्याचे वृत्त शिनहुआ या वृत्तवाहिनीने दिले होते. त्यानंतर या विमानाचा शोध घेण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली होती. आज सकाळी (रविवार) पाणबुड्यांना जावा समुद्रात २३ मीटर खोल अंतरावर काही अवशेष सापडले आहेत. यात मानवी शरीराचे अवयव आणि विमानाच्या अवशेषांचा समावेश आहे, अशी माहिती त्रिसुला कोस्टगार्ड शिपचे कॅप्टन एको सूर्या हदी यांनी दिली.
इंडोनेशियन परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी सांगितले, की बोईंग 737-500ने जकार्ता येथून पहाटे 1 वाजून 56 मिनिटांनी उड्डाण केले होते. पहाटे 2 वाजून 40 मिनिटांनी विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.