मॉस्को- जम्मू -काश्मीर राज्याच्या विशेष दर्जामध्ये भारताने जो बदल केला आहे, तो भारतीय संविधानाच्या चौकटीतील आहे. भारत पाकिस्तानने या मुद्द्यावरुन वातावरण आणखी बिघडू देऊ नये. दोन्ही देशातील संबध सुधारण्यासाठी रशिया कायम सहकार्य करत आली आहे, असे रशियाच्या परराष्ट्र खात्याने म्हटले आहे. यामुळे रशियादेखील पाकला पाठिंबा देण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही देशांतील वादाचे मुद्दे राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या मार्गाने सोडवण्यात यावेत, असे रशियाने म्हटले आहे.
भारताने काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यानंतर रशियाच्या परराष्ट्र विभागाने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. कश्मीर मुद्दा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे रशियाने मान्य केले आहे. भारताने काश्मीर बाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यांना यामध्ये यश मिळताना दिसत नाही. आतापर्यंत पाकच्या बाजूने साधे मतही व्यक्त करण्यास कोणताही देश तयार नसल्याचेच चित्र आहे.
काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे अमेरिकेने याआधीच मान्य केले आहे. तर चीनने काश्मीर प्रश्नी चिंता व्यक्त केली. भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले, तसेच राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांत विभागले. या निर्णयानंतर पाकिस्तान भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.