अबुधाबी - संयुक्त अरब अमिरातीमध्ये असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी, नीट (NEET) परीक्षेसाठी स्थानिक केंद्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील बहुतांश प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे परीक्षेला बसण्यासाठी त्यांना भारतात येणे शक्य होईल, की नाही याची कोणतीही शाश्वती देता येत नसल्यामुळे या विद्यार्थ्यांनी ही मागणी केली आहे.
वैद्यकीय पूर्व परीक्षा असलेली 'नीट' ही यावर्षी २६ जुलैला होणार आहे. अनिवासी भारतीयदेखील ही परीक्षा देऊ शकतात. मात्र, ही परीक्षा केवळ ऑफलाईनच देता येत असल्यामुळे, या विद्यार्थ्यांना भारतात येण्यावाचून पर्याय नाही. एरवी हे विद्यार्थी आपले मूळगाव किंवा त्या राज्यातील एखाद्या केंद्राची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे त्यांना देशात येता येईल की नाही याबाबत काहीच सांगता येत नाही.