नवी दिल्ली :तालिबान-अफगाणिस्तान शांतात चर्चेस भारताने पाठिंबा दिला आहे. अफगाण शांतता चर्चा प्रक्रियेचे प्रमुख डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला यांनी आज(गुरुवार) पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेतली. शांतता चर्चा प्रक्रियेची माहिती त्यांनी पंतप्रधान मोदींनी दिली. या प्रक्रियेस भारताचा पाठिंबा असल्याचे आश्वासान मोदींनी अब्दुल्ला यांना दिले.
अफगाण शांतता चर्चेचे प्रमुख डॉ. अब्दुल्ला पंतप्रधान मोदींशी बोलताना डॉ. अब्दुल्ला अब्दुल्ला हे 'हाय कौन्सिल ऑफ नॅशनल रिकन्सिलेशन' या शांतता प्रक्रियेसाठी खास तयार करण्यात आलेल्या संघटनेचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्त्वाखाली कतार देशातील दोहा शहरात चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मागील काही दशकांपासून अफगाणिस्तान सरकार आणि तालिबानमध्ये संघर्ष सुरू आहे. यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जर चर्चा प्रक्रिय यशस्वी झाली तर देशातील संघर्ष कायमचा मिटेल.
शांतता प्रक्रियेसाठी इतर देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी अब्दुल्ला हे परदेश दौऱ्यावर आहेत. ते पाच दिवस भारताच्या दौऱ्यावर आले असून शांतता प्रक्रियेची माहिती त्यांनी भारताला दिली. भारत-अफगाणिस्तान संबंध आणखी घनिष्ठ करण्यासाठी दोन्ही देश कटीबद्ध असल्याचे बैठकीत मोदी- अब्दुल्ला म्हणाले. बैठकीनंतर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान मोदींचे ट्विटरवरून आभार मानले. अब्दुल्ला यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही सखोल चर्चा केली.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या सहकार्याने तालिबान अफगाणिस्तान सरकारमध्ये शांतता करारावर सह्या करण्यात आल्या. त्यानुसार अमेरिकेचे सैन्य अफागाणिस्तानातून माघारी जाणार आहेत. २००१ पासून अफगाणिस्तानात तालिबानबरोबरच्या लढ्यात अमेरिकेने २ हजार ४०० जवान गमावले आहेत.