कोलंबो -श्रीलंकेमध्ये येऊ घातलेल्या अध्यक्षीय निवडणुकीकडे भारत आणि चीन या दोन्ही देशांचे लक्ष लागून आहे. दक्षिण आशियामध्ये वर्चस्व राखण्यासाठी 'कोलंबो' हा अतिमहत्त्वाचा भौगोलिक भाग ठरत आहे. श्रीलंकेची चीनशी वाढत चाललेली जवळीक भारतासाठी धोक्याची ठरू शकते. मात्र, भारत आणि श्रीलंकादरम्यान हजारो वर्षांपासून मैत्रीचे संबंध राहिले आहेत. आता तर आमचे नाते मैत्रीपलीकडचे आहे, असे मत श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार समन वीरसिंघे यांनी व्यक्त केले आहे.
'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये वीरसिंघे यांनी म्हटले, की व्यापारासाठी श्रीलंकेची कवाडे खुली आहेत. भारतासह इतर देशांनी कोलंबोमध्ये आणि दिल्लीमध्ये अनेक व्यापारी प्रयोग राबविले आहेत. श्रीलंका आणि भारताचे हजारो वर्षांपासून मैत्रीचे संबंध राहिले आहेत. आता तर आमचे नाते हे मैत्रीपलीकडचे आहे. जेव्हाही गरज पडली, तेव्हा तेव्हा भारताने आपला मदतीचा हात श्रीलंकेसाठी पुढे केला आहे. त्यामुळेच श्रीलंकेच्या बीजिंगसोबत असणाऱ्या संबंधांबाबत कसलीही भीती न बाळगता, दिल्लीकडून आणखी गुंतवणूक सुरु राहील, अशी आशाही वीरसिंघे यांनी व्यक्त केली.
असे असले, तरी चीनचे श्रीलंकेवर काही कर्ज आहे, ज्याच्यामुळे श्रीलंका चीनच्या दबावाला बळी पडण्याची शक्यता नकारता येत नाही. याबाबत विचारले असता वारसिंगे म्हटले, की श्रीलंकेचा बाह्य आर्थिक भार हा दहा टक्क्यांहूनही कमी आहे. त्यामुळे असे काही होण्याची शक्यता नाही. एक विकसनशील देश असल्यामुळे देशात जगातील सर्व भागांमधून गुंतवणूक असणे आमच्यासाठी गरजेचे आहे. बाकी देशांप्रमाणेच चीनचीही श्रीलंकेमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक आहे. असे म्हणत, त्यांनी भारतीय उद्योगही भविष्यात श्रीलंकेतील गुंतवणूक वाढवेल, अशी आशा व्यक्त केली.
वीरसिंघे हे रशियन फेडरेशनचे माजी राजदूतदेखील आहेत. श्रीलंकेची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी देशातील व्यापार करण्यासाठीची प्रक्रिया अधिकाधिक सुलभ करणे, आणि जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक वाढवणे असे उपाय त्यांनी सुचवले. या उपायांचा अवलंब केल्यास चीनच्या दबावाला घाबरण्याचे कारणही राहणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले, की इतर सर्व आशियाई देशांप्रमाणेच, आम्हीही आमची आर्थिक धोरणांचे उदारीकरण केल्यास, जगातील गुंतवणुकदारांना आम्ही आकर्षित करू शकेल. त्याप्रमाणेच, जगभरातील किंवा भारत आणि पाकिस्तानसारख्या आशियाई देशांतील खासगी व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही अधिकाधिक संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. जे कोणी नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतील, त्यांनी हे सर्व लक्षात घेऊन आपल्या आर्थिक धोरणांचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. जेणेकरून पर्यटन, शेती (निर्यात) आणि इतर व्यवसायांच्या बाबतीत श्रीलंका चांगले काम करू शकेल. श्रीलंका हे सर्व नक्कीच करू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
इतर देशांशी असलेल्या राजनैतिक संबंधांबाबत बोलताना वारसिंघे म्हणाले, नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष हे सर्व देशांशी चांगले संबध ठेवतच, आशिया उपखंडाला अधिक महत्त्व देतील, अशी मला आशा आहे. तसेच, आपल्या शेजारील राष्ट्रांसोबत असलेले संबंध मजबूत आणि चांगले ठेऊन आता असलेली मैत्री अधिक दृढ करतील अशी आशाही वारसिंघे यांनी व्यक्त केली.
चीनशी वाढत चाललेली जवळीक पाहता, भारताशी असलेल्या संबंधांकडे श्रीलंका कसे पाहते? या प्रश्नाला उत्तर देताना वारसिंघे म्हणाले, भारत आणि श्रीलंकेचे घनिष्ठ असे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत. मला आशा आहे, की दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधही नक्कीच भविष्यात अधिक मजबूत होतील. येत्या पाच वर्षांमध्ये एकत्र काम करून आपले संबंध आम्ही नव्या उंचीवर नेऊ अशी मला खात्री आहे.
संपूर्ण मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा :श्रीलंकेचे भारताशी मैत्रीपलीकडील नाते : समन वीरसिंघे