जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे हे लवकरच भारताला अधिकृत भेट देणार आहेत. राष्ट्रप्रमुखांच्या १२ व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर बैठकीसाठी ते येत आहेत. १५ ते १७ डिसेंबर यादरम्यान ही भेट असेल, असे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, भेटीच्या स्थळाबाबत काहीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तरीसुद्धा, एका आघाडीच्या वृत्तवाहिनीने शिखर बैठक गुवाहाटी येथील ११५ वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात आयोजित केली असल्याचे सांगितले आहे. तसेच या बंगल्याचा जीर्णोद्धार सुरू असल्याचीही माहिती दिली आहे. भारताच्या दौऱ्यावर येणाऱ्या परदेशी राष्ट्रप्रमुखांना भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीची माहिती व्हावी, या हेतूने अशा भेटींसाठी स्थळे बदलण्यासाठी परिचित असलेले पंतप्रधान मोदी यांची हे स्थळ म्हणजे पसंती असल्याचे सांगितले जाते.
जपानला महत्त्व का..?
भारतासोबत वार्षिक शिखर बैठका होत असलेला दुसरा एकमेव देश रशिया असून, त्याने नुकत्याच झालेल्या १८ व्या भारत-रशिया शिखर बैठकीत सहभाग घेतला होता. याशिवाय, चीन हा आणखी एक देश आहे ज्याच्यासोबत आपण अशी वार्षिक राष्ट्रप्रमुखांची शिखर बैठक सुरू केली आहे. मात्र, चीनसोबत होत असलेली शिखर बैठक ही अनौपचारिक आहे. त्यामुळे, स्वाभाविकपणेच एखाद्याला याचे आश्चर्य वाटू शकेल की, जपानला बड्या दोन राष्ट्रांइतके का महत्व दिले जात आहे. याची कारणे साधी पण मजबूत आहेत. आर्थिकदृष्ट्या, जपान हा भारताचा सर्वात मोठा दाता आहे. गुंतवणूकनिहाय, तो तिसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश असून २००० सालापासून २७.२८ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक त्याने भारतात केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील आर्थिक सहकार्याची तसेच गुंतवणुकीची दोन चमकदार उदाहरणे म्हणजे दिल्ली मेट्रो, जी जपानी साहाय्याने उभारण्यात आली असून मुंबई अहमदाबाद उच्च वेगाची रेल्वे जिला बुलेट ट्रेन म्हणून ओळखले जाते, ती आहे.
दुसऱ्या प्रकल्पासाठी, ज्याची परिकल्पना २०१३ मध्ये केली गेली होती, जपानने भारताला ०.०१ टक्के व्याजाने एक लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे वचन दिले असून, कर्जावरील व्याजाची परतफेड न करण्यासाठी १५ वर्षांची सूट दिली आहे. भारताने केलेला हा सर्वात मोठा अनुकूल असा करार असावा. मात्र दुर्दैवाने, महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकार असल्याने या करारावर रद्द होण्याची टांगती तलवार लटकते आहे. आतापर्यंत, पूर्वी झालेल्या शिखर बैठकांमध्ये २४ हून अधिक करार आणि सामंजस्य करार विविध क्षेत्रांत झाले आहेत, पण ते कोणत्याही प्रकारे मोठे यश आहे, असे नाही. अनेक जपानी कंपन्या भारतातील वाहने, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधी निर्मिती क्षेत्रात आहेत. ११.५ टक्के क्षेत्रफळ आणि भारताच्या ११ टक्क्यांहून कमी लोकसंख्या असलेला हा छोटा देश आर्थिक आणि तांत्रिक विकासाचे एक शक्तीशाली केंद्र असून त्याचा जीडीपी हा भारताच्या जीडीपीच्या दुप्पट आहे. तसेच, मानवी विकास निर्देशांकात त्याचा क्रमांक १९ व्या स्थानावर (०.९१५) आहे, जो आपल्या १२९ व्या स्थानापेक्षा (०.६६७) कितीतरी जास्त आहे.
चीनला शह देण्यासाठी जपानची मदत..