मुंबई - भारताने दीड लाख कोरोना लसीचे डोस भूटानला भेट दिले आहेत. शेजारी देशांना कोरोनाचा सामना करण्यासाठी मोफत लस देण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. मुंबईतील शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज (बुधवार) पहाटे कोरोना लसीचे डोस घेवून विशेष विमान झेपावले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोव्हिशिल्ड लसीचे दीड लाख डोस आज भूतानला पोहचतील. भारताकडून कोरोना लसीचे मोफत डोस सर्वप्रथम भूटानला मिळाले आहेत. भारत आणि भूटानमध्ये मैत्रीपूर्ण संबंध असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही दोन्ही देशांतील व्यापार सुरू होता. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा भारताने मोठ्या प्रमाणात भूतानला केला.
कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी लसीकरण सुरू केले आहे. भारतात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या लसींना आणीबाणीच्या काळात वापरासाठी परवाना देण्यात आला आहे. भारताने शेजारील देशांनाही मानवतेच्या भावनेतून लस देण्याचा निर्णय घेतला आहे.