इस्लामाबाद - अमेरिकेने आयोजित केलेल्या हवामान बदल परिषदेत पाकिस्तानला आमंत्रित न केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानला हवामान बदल परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही, याबद्दल आश्चर्य असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान अनेक वर्षांपासून हवामान बदलांवर सतत काम करत आहे. पाकिस्तानचे प्रयत्न जगाने केवळ स्वीकारलेच नाही तर त्यांचे कौतुकही केले. पाकिस्तान या क्षेत्रातील आपले अनुभव इतरांसोबत शेअर करण्यासाठी तयार आहे, असेही त्यांनी म्हटलं.
पाकिस्तान सरकार हवामान बदलांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि ग्रीन पाकिस्तान तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ग्रीन पाकिस्तान या अभियानाअंतर्गत देशभरात 10 कोटी झाडे लावली, नद्यांची साफसफाई करणे सुरू केले आहे, असे इम्रान खान यांनी सांगितले.
खैबर पख्तूनख्वामध्ये गेल्या सात वर्षात केलेल्या कामांतून आम्हाला बरेच अनुभव मिळाले आहेत. पर्यावरण संरक्षणासंदर्भातील सरकारी धोरणांनाही जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या धोरणांचे कौतुक केले जात आहे. कामातून मिळालेला अनुभव आम्ही इतर राज्यांसोबत किंवा देशांसोबत सामयिक करण्यास आणि त्यांना मदत करण्यास तयार आहोत. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद 2021 साठी आधीच प्राधान्यक्रम निश्चित केल्याचे इम्रान खान यांनी सांगितले.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 22-23 एप्रिलला हवामान बदल परिषद (सीओपी 26) आयोजित केले आहे. यात जगातील सुमारे 40 देशांना आमंत्रित करण्यात आले आहे. पाकिस्तानला परिषदेत उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांकडून नियुक्त करण्यात आलेले हवामान बदलाचे विशेष दूत जॉन कॅरे सध्या तीन आशियाई देशांच्या दौर्यावर आहेत. 1 मार्चपासून सुरू झालेल्या दौऱ्यात ते संयुक्त अरब अमिराती, भारत आणि बांगलादेशला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात पाकिस्तानचा समावेश नाही.
हेही वाचा -कसला बर्ड फ्लू अन् कसलं काय; तामिळनाडूमध्ये बिर्याणीची डिमांड झाली 'हाय'!