वॉशिंग्टन डी.सी - अफगाणिस्तानवरून कतार गेलेल्या एका विमानाच्या लँडिंग गियरमध्ये आणि चाकांमध्ये मृतदेह आढळल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. सोमवारी काबूल विमानतळावर लँडिंग झाल्यानंतर नागरिकांनी विमानाला घेरले होते. देश सोडून जाण्यासाठी काही नागरिक विमानाच्या चाकेवर आणि लँडिंग गियरमध्ये बसले. तेव्हा परिस्थिती बिघडल्यानंतर सी-17 विमानाच्या वैमानिकाने उड्डान घेतले, असे हवाई दलाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
काबूल विमानतळावरील नागरिकांची अत्यंत भयावह स्थिती आहे. विमानतळावरील परिस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटोज सोशल माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. अफगाणिस्तानमधील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. मिळेल त्या मार्गानं ते देश सोडताना ते दिसत आहेत. काही जण काबूल विमानतळावरुन उड्डाण घेणाऱ्या विमानाच्या चाकाला लटकून बसल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून दिसून आले होते. तसेच विमानाच्या चाकावर लटकलेल्या दोघांचा उंचावरुन पडून मृत्यू झाला होता.