कैरो - इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होसनी मुबारक यांचा मृत्यू झाला. ते ९१ वर्षांचे होते. लष्कराकडून २०११ ला त्यांना पदच्युत करण्यात आले होते. त्यापूर्वी जवळपास तीन दशके ते इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष होते. देशात १८ दिवस चालू असलेल्या आंदोलनामुळे ११ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
होसनी मुबारक यांचा मृत्यू झाल्याची माहिती देशातील सरकारी टीव्हीकडून देण्यात आली. या वृत्ताला त्यांच्या नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. देशातील एका आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र, त्यांची शिक्षा माफ करण्यात आली होती आणि मार्च २०१७ मध्ये त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले होते.