काबूल -अफगाणिस्तान तालिबानी राजवटीखाली आले असून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपले प्राण वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने लोक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसत आहे. विमानतळावर अन्न-पदार्थ आणि पाण्याचे भाव गगनाला टेकले आहेत. एक पाण्याची बॉटल 40 डॉलर म्हणजेच 3 हजार रुपयांना मिळत आहे. तर एका भाताच्या प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजेच जवळपास 7 हजार 500 रुपये मोजावे लागत आहेत.
विमानतळावर अफगाणिस्तानची करन्सी चालत नसून फक्त डॉलरमध्ये पैसे घेण्यात येत आहेत. यामुळे अफगाण नागरिकांना कठिण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. दोन लाखांहून अधिक लोकांची गर्दी आहे. अशा परिस्थितीत तेथील परिस्थिती अधिक वाईट असल्याचे म्हटले जाते. लोकांना अन्न आणि पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर हजारो रुपये खर्च करून लोक खाद्यपदार्थ आणि पिण्याचे पाणी विकत घेत आहेत. तर काही जण कधी आपला क्रमांक लागेल आणि हा देश सोडून जाऊ, याचीच उपाशीपोटी वाट पाहत आहेत. दुर्दैव म्हणजे, यात लहान मुलांचे अतोनात हाल होत आहेत. काही जण बेशूद्धीच्या अवस्थेत पोहचले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, घरातून विमानतळापर्यंत पोहचण्यासाठी त्यांना 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागत आहे. कारण, तालिबानचा शहरापासून विमानतळापर्यंत पहारा आहे. शहरात तालिबान्यांच्या गोळीबारामुळे दहशत आहे. तर हजारोंचा जमाव ओलांडून विमानतळाच्या आत जाणे कठीण आहे. एकदा तुम्ही विमानतळाच्या आत गेलात तरी विमान मिळण्यास किमान पाच ते सहा दिवस लागत असल्याची माहिती आहे.