हाँगकाँग -चीनमधील अल्पसंख्यांक असलेल्या उईगर लोकांच्या समर्थनार्थ हाँगकाँगमध्ये रविवारी एका मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी शेकडोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. यादरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट पहायला मिळाली.
सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या या मोर्चाला संध्याकाळी पाचनंतर (स्थानिक वेळ) हिंसक वळण लागले. आंदोलकांनी चीनचा राष्ट्रध्वज उतरवून तो जाळण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवण्यास सुरुवात केली. यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने आंदोलकांवर बंदूक तानली. त्याने गोळी झाडली नाही. मात्र, यामुळे आंदोलक आक्रमक झाले. एका चिनी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी पोलिसांवर पाण्याच्या बाटल्यांपासून जे मिळेल ते फेकण्यास सुरुवात केली. त्याच्या विरोधात पोलिसांनी त्यांच्यावर 'पेपर-स्प्रे'चा मारा केला.