हाँगकाँग - रविवारी पार पडलेल्या मतदानात हाँगकाँगच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवला. ७१.२ टक्के मतदानासह आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची काल नोंद झाली. याआधी २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत ४७ टक्के मतदान झाले होते. ती टक्केवारी पाहता कालचे मतदान हे खरोखरीच ऐतिहासिक असे आहे.
प्रत्यार्पण कायद्यात दुरुस्ती स्वीकारण्याच्या विरोधामुळे, गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे हाँगकाँगमध्ये तणावाचे वातावरण होते. या आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर होणारी निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मतदान अपेक्षेपेक्षा जास्त शांततेत पार पडले. प्रशासनाला अशी अपेक्षा होती, की लोक काळे कपडे घालून किंवा मास्क घालून निषेध व्यक्त करत मतदानाला येतील, मात्र तशा प्रकारच्या घटना अगदीच कमी प्रमाणात आढळून आल्या. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेले मतदान, हे सरकारविरोधी आंदोलनाचे लोक समर्थन करत असल्याचे द्योतक आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांवर या स्थानिक निवडणुकांचा मोठा परिणाम होणार आहे. सध्या तरी, हाँगकाँगमध्ये प्रो-डेमोक्रसी (लोकशाही समर्थक) सरकारलाच लोकांचा पाठिंबा आहे, असे दिसत आहे.
हेही वाचा : राष्ट्राध्यक्ष गोताबाया भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांतून मुक्त, परदेश प्रवासावरील बंदीही हटवली