इस्लामाबाद - दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याप्रकरणी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने लष्कर ए तोयबाचा संस्थापक हाफिज सईदला 10 वर्ष 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सईदसह जफर इक्बाल, याह्या मुजाहिद आणि अब्दुल रहमान मक्की यांनाही साडेदहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
यंदा हाफिज सईदला चौथ्यांदा शिक्षा सुनावण्यात आली आहे. हाफीज सईद सध्या लाहोरमध्ये एका दहशतवादी निधी प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा भोगत आहे. लाहोर आणि गुजरनवाला शहरातील दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला प्रत्येकी साडेपाच वर्षे तुरुंगवास आणि 15 हजार दंड ठोठावला होता. मात्र, दोन्ही शिक्षा एकदाच लागू होत असल्याने तुरुंगवासाचा कालावधी हा साडेपाच वर्षच आहे. सईदवर दहशतवादी वित्तपुरवठा, मनी लाँडरिंग, बेकायदेशीर जमीन हडपण्यासह 29 खटले सुरू आहेत.
दहशतवाद कमी करण्याच्या दृष्टिने पाऊल -
हाफिज सईदचा वेगवेगळ्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आहे. तसेच 2008 मुंबई दहशतवादी हल्ल्याला तो जबाबदार आहे. ज्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांसह 166 भारतीयांचा जीव गेला होता. दहशतवादाला वित्तपुरवठा केल्यावरून हाफिज सईदवर केलेली कारवाई ही दक्षिण आशियातील शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण करणारा दहशतवाद कमी करण्याच्या दृष्टिने टाकलेले एक पाऊल आहे.
पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच -
मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याविरोधात पुरेशी पावले उचलण्यात अपयशी ठरल्यामुळे जून 2018मध्ये पाकिस्तानला करड्या यादीत टाकण्यात आले. यानंतर, पाकिस्तानला 27 कलमी कृती आराखडा देण्यात आला. पाकिस्तान यातील बाबींचे पालन करण्यात असफल झाल्यास त्याला काळ्या यादीत टाकले जाऊ शकते. सध्या पाकिस्तान ग्रे लिस्टमध्येच आहे. जर पाकिस्तानला आगमी बैठकीत एफएएफटीच्या ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात आले तर हाफिज सईदला पुन्हा सोडून देण्यात येईल. आंतरराष्ट्रीय दबावामुळेच पाकिस्तानने ही कारवाई केल्याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा -पाकिस्तान एफएटीएफच्या 'ग्रे लिस्ट'मधून बाहेर पडण्याची शक्यता नाहीच : अहवाल