टोकियो- जपानच्या किनाऱ्यावर असलेल्या डायमंड प्रिंसेस या जहाजामधील आणखी चार भारतीयांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता या जहाजावरील कोरोनाची लागण झालेल्या भारतीयांची संख्या १२ वर पोहोचली आहे. भारतीय दूतावासाने रविवारी याबाबतची माहिती दिली.
डायमंड प्रिन्सेस या आलिशान जहाजावरील अनेक नागरिकांना COVID-19 या विषाणूची लागण झाली आहे. बऱ्याच काळानंतर अखेर, कोरोना विषाणूचा संसर्ग न झालेल्या व्यक्तींना जहाजावरून बाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास एक हजार प्रवासी आणि जहाजाचे कर्मचारी हे जहाजावरच थांबणार आहेत.
प्रवाशांची आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांची तपासणी करताना, दुर्दैवाने आणखी चार प्रवाशांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली आहे. अशा आशयाचे ट्विट करत भारतीय दूतावासाने याबाबत माहिती दिली. यापूर्वी या जहाजावरील आठ भारतीयांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. हे सर्व भारतीय उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. १३२ कर्मचारी आणि ६ प्रवासी असे एकूण १३८ भारतीय या जहाजावर आहेत. तर, या जहाजावर एकूण ३,७११ लोक अडकले आहेत.
चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत २ हजार ३४६ जणांचा बळी गेला आहे. एकट्या हुबेई प्रांतात कोरोना विषाणूची लागण ६४ हजार जणांना झाली आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.
हेही वाचा :चीनमध्ये कोरोनाचे २ हजार ३४६ बळी; दक्षिण कोरियात ५५६ जणांना लागण