हनोई - व्हिएतनाममध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून झालेल्या संततधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन होऊन तब्बल 90 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 लोक बेपत्ता झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
स्थानिक वृत्तसंस्थेनुसार, सर्वाधिक मृत्यू क्वांग ट्राय, थुआ थिएन ह्यू आणि क्वांग नेम या प्रांतांमध्ये झाले आहेत, असे नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नियंत्रण या केंद्रीय संचालक समितीने एका निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा -व्हिएतनाममध्ये आणखी एक भूस्खलन, लष्करी छावणीवर दरड कोसळून 22 जवान दबले
सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत, हा तिन्ह, क्वांग बिन्ह, क्वांग ट्राय आणि थुआ थिन ह्यू भागांतील 1 लाख 21 हजार 280 लोकांना सुरक्षित भागात हलवण्यात आले. अद्याप सुमारे 1 लाख 21 हजार 700 घरे पूरग्रस्त आहेत. 6 ऑक्टोबरपासून या भागांतील 5 लाख 31 हजार 800 जनावरे आणि कोंबड्यांसारखे पाळीव पक्षी मारले गेले किंवा वाहून गेले आहेत, असे समितीने म्हटले आहे. शिवाय, मुसळधार पावसामुळे अनेक राष्ट्रीय महामार्ग व स्थानिक रस्ते खराब झाले आहेत.
व्हिएतनाम न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य नघे एन आणि हा तिन्ह प्रांतातील शाळांनी विद्यार्थ्यांना सोमवारपासून घरीच राहण्यास सांगितले आहे.
बुधवारपर्यंत मध्य भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, काही भागात 600 मिमीपेक्षाही जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा देण्यात आला आहे. येथे रविवारी लेव्हल-फोर अलर्ट जारी करण्यात आला आहे. हा दुसऱ्या क्रमांकाच्या पातळीवरील सतर्कतेचा इशारा आहे.
हेही वाचा -गिलगिट-बाल्टिस्तान: बसवर दरड कोसळून भीषण अपघात, 16 जणांचा मृत्यू