काबूल - अफगाणिस्तानात गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर आज पुन्हा निर्वासन उड्डाणे तातडीने सुरू झाली आहेत. आज अमेरिकन सैन्यांच्या विमानांनी निर्वासितांना घेऊन उड्डाने भरली. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी आणि एका बंदुकधाऱ्याने विमानतळाबाहेर जमलेल्या निर्वासितांवर हल्ला केला होता. या स्फोटात 95 अफगाण नागरिकांचे आणि 13 अमेरिकन सैनिकांचे प्राण गेले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याची जबाबदारी ISIS या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या घटनेचा अमेरिकेने निषेध व्यक्त केला आहे.
विमानतळावर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन पत्रकार परिषदेला संबोधित करताना भावनिक झाले. दहशतवाद्यांना या कृत्याची किंमत मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटलं. 'हा रक्तपात करून अमेरिकेला निर्वासन मोहीम पूर्ण करण्यापासून रोखू शकत नाही. आम्ही अफगाणिस्तानधील प्रत्येक अमेरिकन नागरिकाची सुटका करू. हल्ल्यास जबाबदार असलेल्यांना शोधून काढण्यात येईल आणि त्यांना याची जबर किंमत मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दहशतवाद्यांना दिला.
अमेरिकेने सैन्य माघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवला आहे. तब्बल दोन दशकानंतर त्यांच्या हाती सत्ता आली असून देशात अराजकता पसरली आहे. तालिबान्याच्या राजवटीतून आपली सुटका करण्यासाठी नागरिक मिळेल त्या मार्गाने देश सोडण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितील बायडेन यांना जबाबदार धरण्यात येत आहे. अमेरिकेने जर सैन्य माघारीची प्रक्रियेला वेग दिला नसता. तर तालिबानच्या हाती अफगाण गेले नसते, असे म्हटलं जात आहे. मात्र, बायडेन आपल्या निर्णयावर ठाम आहेत. 20 वर्ष थांबून जर काहीच फरक पडला नाही. तर आणखी काही दिवस थांबून काय होणार होते. अफगाण सैनिकच त्यांच्या देशासाठी लढण्यास तयार नाहीत. तर अमेरिकन सैन्यांना तिथे लढण्यासाठी का पाठवावं. माझ्या सैन्य माघारीच्या निर्णयाची इतिहासात तर्कसंगत, विवेकी आणि योग्य म्हणून नोंद होईल, असे बायडेन यांनी म्हटलं.
अफगाणिस्तानातून अमेरिकेने आतापर्यंत तब्बल 100,000 जणांना बाहेर काढले आहे. तर सध्या अफगाणिस्तानात 1 हजार अमेरिकन नागरिक आणि काही अफगान नागरिक देश सोडण्यासाठी प्रयत्न करत असून त्यांना अमेरिका बाहेर काढणार आहे. यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख जनरल फ्रँक मँकेन्झी म्हणाले, की विमानतळावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था आहे. नागरिकांना बाहेर काढण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केला जात आहे. सुमारे 5,000 लोक विमानतळावर फ्लाइटच्या प्रतिक्षेत आहेत.