महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

कोरोना विषाणूमुळे चीनमधील बळींचा आकडा १०१७; तर ४० हजारांपेक्षा जास्त व्यक्तींना लागण

चीनमध्ये मृतांचा आकडा एक हजांराच्याही वर गेला आहे. तर, कोरोना विषाणूची लागण ४२ हजार नागरिकांना झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रीयसस यांनी याबाबतची माहिती दिली.

corona virus
कोरोना व्हायरस संग्रहित छायाचित्र

By

Published : Feb 11, 2020, 11:38 PM IST

बीजिंग - चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे गेलेल्या बळींचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये मृतांचा आकडा एक हजांराच्याही वर गेला आहे. तर, कोरोना विषाणूची लागण ४२ हजार नागरिकांना झाली आहे. चीनबाहेर २४ देशांमधील ३९३ नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक टेड्रोस अधानोम घेब्रीयसस यांनी याबाबतची माहिती दिली. तसेच या आजाराला (COVID-१९) असे नाव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २००३ साली चीनमध्ये सार्स आजारामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा कोरोना विषाणूच्या विळख्याने पार केला आहे. मंगळवारी या एका दिवसातच लागण झालेल्या १०८ नागरिकांचा मृत्यू झाला.

डिसेंबरमध्ये चीनमधील हुबेई प्रांतात या विषाणूची लागण झाल्याचे पहिल्यांदा समोर आले होते. चीनबाहेर कोराना विषाणू संसर्गामुळे दोन बळी गेले आहेत. त्यातील एक बळी हाँगकाँगमध्ये आणि दुसरा फिलिपाईन्समध्ये गेला आहे. तसेच २४ देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे. चीनमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

कोरोना विषाणूच्या धोक्यामुळे अनेक देशांनी चीनमधील आपल्या नागरिकांना बाहेर काढले आहे. तसेच चीनमधून येण्यास आणि जाण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतानेही हुबेई प्रांतात अडकलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढले आहे. मात्र, अजूनही बरेचजण तेथे अडकून पडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता चीनमधील भारतीय दुतावासाने नागरिकांसाठी विविध विभागांचे हॉटलाईन नंबर आणि ईमेल आईडी जारी केले आहेत.

हुबेई प्रांताबाहेर विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून इतर चीनशी या भागाचा संपर्क तोडण्यात आला आहे. त्यामुळे लाखो लोक घरांमध्ये अडकून पडले आहेत. बस, ट्रेन, विमान सेवा पुर्णतहा: ठप्प झाली आहे. नागरिकांना जीवनोपयोगी वस्तू घेणेही मुश्किल झाले आहे. सर्व शहरे सुमसाम झाली आहे. आरोग्य विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून काही प्रमाणात यश येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाला आरोग्य आणिबाणी हाताळताना अडचणी येत आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचेही प्रशासनाने मान्य केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details