बीजिंग- कोरोना व्हायरसच्या (विषाणू) संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आत्तापर्यंत या विषाणूमुळे चीनमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९७० नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून देशाच्या अनेक प्रांतातील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त रुग्ण चीनमधील हुबेई प्रांतात सापडले आहेत. अनेक प्रांतामध्ये लागू केलेले निर्बंध कडक करण्यात आले आहे.
चीनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी विमानतळावर अनेक देशांनी पथके स्थापन केली आहेत. कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांपासून इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवण्यात येत आहे. फक्त चीनच नाही तर आता थायलंड, व्हिएतनाम, सिंगापूर, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, अमेरिका फ्रान्स देशांमध्येही कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे निमोनियासारखी गंभीर लक्षणे रुग्णामध्ये दिसून येतात. सौदी अरेबियातही एका भारतीय नर्सलाही या विषाणूची लागण झाली आहे. यासोबत भारतातील १० जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. केरळ राज्याने सर्व विमानतळावर तपासणी पथकाची स्थापना केली आहे. या व्हायरसमुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.