कोलंबो - 'बुरेवी' चक्रीवादळ मुसळधार पावसासह आज (बुधवार) श्रीलंकेत दाखल होणार आहे. आज (बुधवारी) सायंकाळी उशीरा श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यावर हे वादळ धडकणार आहे. त्यामुळे देशाच्या किनारी भागात मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
श्रीलंकेच्या स्थानिक वेळेनुसार आज सायंकाळी ७ ते रात्री १० च्या दरम्यान चक्रीवादळ पूर्व किनाऱ्यावर दाखल होणार असून त्यामुळे मुसळधार पाऊस आणि मालमत्तेचे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून योग्य ती काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करण्यास जाऊ नये, असे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच व्यापारी बोटींनीही समुद्रात जाऊ नये, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत.
आपत्कालीन पथके सज्ज
ज्या जिल्ह्यांमध्ये वादळ येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, त्यांना आपत्कालीन काळासाठी निधी देण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळात अन्न, वैद्यकीय सुविधा आणि इतर गरजेच्या सामानाची व्यवस्था करण्यात आली असून आपत्तीनिवारण पथकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणाऱ्या काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.