भारताचे शेजारी देश कसा करत आहेत कोरोनाशी सामना..? - म्यानमार कोरोना
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारताने लॉकडाउनचा अवलंब करून आता एक महिना होत आहे. दुसऱ्या बाजूला जिथून कोरोनाचा उगम आणि प्रसार झाला त्या चीनने विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे. अशावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सारखे शेजारी देश काय करीत आहेत असा प्रश्न पडतो..
भारताचे शेजारी देश कसा करत आहेत कोरोनाशी सामना..?
By
Published : Apr 30, 2020, 4:34 PM IST
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी भारताने लॉकडाउनचा अवलंब करून आता एक महिना होत आहे. दुसऱ्या बाजूला जिथून कोरोनाचा उगम आणि प्रसार झाला त्या चीनने विषाणूला नियंत्रणात आणण्यात यश मिळविले आहे. अशावेळी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सारखे शेजारी देश काय करीत आहेत असा प्रश्न पडतो. तेथे कोविड १९ चा प्रभाव कसा आहे? तिथल्या सरकारांनी काय निर्णय घेतले आहेत? त्या देशातील लोकांना कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असेल? तुलनेने आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या या देशांची आर्थिक परिस्थिती काय आहे? वैद्यकीय खबरदारी म्हणून तिथे काय उपाययोजना राबविल्या आहेत? अशा अनेक कुतुहूल निर्माण करणाऱ्या गोष्टींचा धांडोळा येथे घेतला आहे...
अफगाणिस्तान
पायाभूत सुविधा आणि सेवांचा अभाव...
अगोदरच तालिबान समस्येने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तानला आता कोरोनाचा देखील सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमध्ये कमालीचे दारिद्र्य आहे तर पायाभूत सुविधांची देखील कमतरता आहे. त्यातच आता कोरोना विषाणूला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्याने आणि इतर उपायांमुळे देशाची आर्थिक परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. हजारो स्वयंरोजगार युनिट बंद पडले आहेत. लाखो लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. गरिबांच्या संरक्षणासाठी अफगाणिस्तान सरकार आता पूर्णपणे चीन, पाकिस्तान, इराण, उझबेकिस्तान आणि भारताच्या मदतीवर अवलंबून आहे. त्यातच पाकिस्तान आणि इराणमधून लाखो अफगाणी नागरिक परत मायदेशी आल्याने नवीन समस्या उद्भवली आहे.
अफगाणिस्तानात कोविड १९चा पहिला रुग्ण २४ फेब्रुवारी रोजी आढळला. तर २२ मार्च रोजी कोविड १९ मुळे मृत्युमूखी पडल्याची पहिली नोंद झाली. पीडित आणि पीडित नसलेल्या नागरिकांकडून विलगीकरणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या वेगाने झाला आहे. यामुळे देशातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊन जवळजवळ सर्वच प्रांतात लॉकडाउन करण्याची वेळ ओढावली आहे. विशेष म्हणजे या साथीची तीव्रताच इतकी आहे की तालिबानी समर्थक देखील लॉकडाऊनला पाठिंबा देत आहेत.
पाकिस्तान
सुप्त वाहकांचा समाजात मुक्त संचार..
तब्बल २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या अत्यंत हालाखीचे जीवन जगत असलेल्या पाकिस्तानमध्ये कोरोनाचे अस्मानी संकट कोसळले आहे. लॉकडाऊनमुळे जवळपास १.८७ कोटी लोक आपल्या नोकर्या गमावतील असा अंदाज आहे. इराणला गेलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यांदा 26 फेब्रुवारी रोजी कोरोना विषाणूचे निदान झाले. तर 30 मार्च रोजी पहिला मृत्यू नोंदविण्यात आला. लाहोरमध्ये १०-१२ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या तबलीघी जमातच्या मेळाव्याने विषाणूचे मोठ्या संख्येने संक्रमक व्यक्ती / ‘सुपर वाहक' तयार झाले. सरकारने सांगितलेल्या ‘सोशल डिस्टंसिंग’च्या इशार्याकडे दुर्लक्ष करून दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक एकत्र आले होते. यात स्थानिकांबरोबरच विविध 40 देशांच्या प्रतिनिधींचा देखील समावेश होता. त्यामुळे विषाणूचा फैलाव अतिशय वेगाने झाला. कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेल्याने तेथील प्रशासनाने सुमारे २० हजार तबलीघींचे क्वारंटाईन / विलगीकरण केले. १५ मार्चपासून सर्व राज्यांनी एकामागून एक लॉकडाऊन जाहीर केले. तर सामाजिक उद्रेकामुळे कोरोनाचा फैलाव झाल्याने केंद्र सरकारने 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. दरम्यान आता निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता आणली आहे.
देशातील जवळपास 8 कोटी गरिबांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ११ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. अद्याप लाखो लोक उपासमारीचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत असला तरी सरकारने रमजानच्या प्रार्थनांसाठी मशिदी उघडण्यास परवानगी दिली आहे. टेस्टिंग/ चाचण्यांचा वेग कमी असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आढळून येत नाहीये. मात्र यामुळे बरेच सुप्त वाहक किंवा कोरोनाची प्रमुख लक्षणे आढळून न आलेले मात्र कोरोनाने बाधित रोगी मुक्तपणे देशात संचार करत आहेत. अशा रुग्णांमुळे समाजाला मोठा धोका असतो. तथापि, आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने १.१ लाख बेडची व्यवस्था केली आहे.
भूतान
जलद प्रतिसादामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याची खात्री..
भूतानमधील पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद 6 मार्च रोजी करण्यात आली. अमेरिकेतील एका ७९ वर्षीय प्रवाशास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच त्याची पत्नी आणि संपर्कात आलेल्या इतर 70 जणांचे विलगीकरण करण्यात आले. त्यानंतर १३ दिवसांनी हा रुग्ण अमेरिकेला रवाना झाला. तथापि, त्याची पत्नी आणि ड्रायव्हर भूतानमध्येच राहिले. भारतात विषाणूचा फैलाव झाल्याचे कळताच भूतानच्या राजाने संपूर्ण भारत-भूतान सीमा बंद केली. विविध वस्तूंच्या आयातीवरही बंदी घालण्यात आली. जे लोक भारत, मालदीव आणि श्रीलंका येथे शिक्षणासाठी किंवा कामानिमित्त गेले होते त्यांना माघारी बोलावून देशाची राजधानी थिंपू येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात आले. पूर्णपणे बरे झाल्यानंतरच त्यांना घरी पाठविण्यात आले. असे विविध उपाय योजून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे.
श्रीलंका
नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून तयारी..
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला कसे सामोरे जावे हे श्रीलंकेने जगाला दाखवून दिले आहे. श्रीलंकन सरकार आपत्तीसाठी तयार होते. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत सरकारने पुढाकार घेऊन कृती केली. सरकारच्या सतर्कतेमुळे देशाची सुरक्षितता जपण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली. सुरुवातीला, ज्या देशांमध्ये विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याने धोका आहे त्या देशांच्या यादीत श्रीलंकेचा 16 वा क्रमांक होता. तथापि, योग्य रणनीती आखून आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करून जीवघेण्या साथीवर यशस्वीरित्या मात करणाऱ्या देशांच्या यादीत श्रीलंका ९व्या स्थानावर आहे. सरकारने देशभरात राबवलेल्या धोरणांना यश आल्याचे यामुळे अधोरेखित झाले आहे.
डब्ल्यूएचओने कोरोना विषाणू आणि साथीच्या विषयावरील सूचना जारी करताच श्रीलंकेतील सर्व विमानतळांवर तपासणी केंद्रे उभारली गेली होती. 27 जानेवारी रोजी पहिल्यांदा चीनमधून श्रीलंकेत परतलेल्या महिलेला कोरोनाची लक्षणे असल्याचे निदान झाले. त्यानंतर तातडीने त्या महिलेला क्वारंटाईन करण्यात आले. वुहानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यात आले. त्यानंतर विलीगीकरणाच्या वेळेची पूर्तता केल्यावरच त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे पाठविण्यात आले. श्रीलंका येथे पर्यटनासाठी आलेल्या काही इटालियन पर्यटकांकडून स्थानिक टुरिस्ट गाईडला विषाणूची लागण झाल्यानंतर १० मार्च रोजी श्रीलंकेत कोविडची पहिली घटना नोंदली गेली. त्यानंतर 14 व्या दिवसापासूनच सरकारने देशात संचारबंदी आणि लॉकडाउन उपाय लागू केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारा विषाणूचा प्रसार रोखण्यात त्यांना मदत झाली.
बांगलादेश
प्रचंड गरिबी - रोहिंग्या स्थलांतरितांमुळे अडचणीत वाढ..
बांगलादेशची लोकसंख्या 16 कोटी आहे. मात्र आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास देशात फक्त ११६९ आयसीयू बेड उपलब्ध आहेत. म्हणजे एक लाख लोकांमागे एका बेड इतके देखील प्रमाण नाही. एप्रिल महिनाअखेर पर्यंत आणखी १५० बेड उभारण्याचे प्रस्तावित आहे. तब्बल ११५५ टक्क्यांच्या वाढीने देशात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. संपूर्ण आशियात विषाणू फैलावाचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. ८ मार्च रोजी बांगलादेशात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तर त्याच महिन्याच्या १८ तारखेला पहिला मृत्यू नोंदविला गेला. मार्चपासूनच सरकार लॉकडाऊनची अंमलबजावणी करीत आहे. देशातील अर्थव्यवस्थेचे मुख्य स्त्रोत असलेल्या वस्त्रोद्योग उद्योगाला मात्र सर्व प्रकारच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. देशात आतापर्यंत फक्त ५० हजार टेस्ट झाल्याअसून मृतांचा आकडा वेळेवर जाहीर करण्यात येत नसल्याचा आरोप बांगलादेश सरकारवर केला जात आहे. दुसरीकडे, निर्वासित छावण्यामध्ये राहणारे 10 लाख रोहिंग्या कोरोना पसरवण्यात कारणीभूत ठरतील अशी चिंता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तान
बांगलादेश
अफगाणिस्तान
श्रीलंका
एकूण रुग्ण
११,९४०
४,९९८
१,४६३
४५२
बरे झालेल्यांची संख्या
२,७५५
११३
१८८
११८
एकूण मृत्यू
२५३
१४०
४७
७
म्यानमार
कमालीची गुप्तता..
म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या चीन आणि थायलंडने त्यांच्या देशावर मोठे संकट ओढावल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणि त्यामुळे होणारे मृत्यू झपाट्याने वाढत असताना देखील म्यानमार मात्र आपल्या देशावर कोरोनाचा खूप कमी प्रमाणात परिणाम झाल्याचे म्हणत आहे. म्यानमार सरकार पुरेशा टेस्ट करत नसून रुग्णांची संख्या देखील पारदर्शीपणे नोंदवत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे म्यानमार नागरिकांची जीवनशैलीच जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गाला दूर ठेवत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
म्यानमारमध्ये हस्तांदोलन किंवा आलिंगन देण्याच्या सवयीला प्रोत्साहित केले जात नाही. तसेच नोटा मोजताना थुंकी लावणे यांसारख्या सवयी म्यानमारमधील नागरिकांमध्ये नाहीत. कोरोना संसर्गाच्या अगोदरपासूनच देशात या जीवनशैलीचा अवलंब केला जात असल्याचे सरकारने म्हटले आहे. २३ मार्च रोजी म्यानमारमध्ये पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक सरकारने संबंधित जिल्ह्यात लॉकडाउन लागू केले. दरम्यान संपूर्ण देशात सोशल डिस्टंसिंगचे कठोर पालन होईल अशी व्यवस्था केंद्र सरकार करीत आहे.
नेपाळ
टेस्टिंग करण्याचे देखील बजेट नाही..
23 जानेवारी रोजी चीनमधील वुहान प्रांतातून परतलेल्या एका तरुणामध्ये कोरोना प्रादुर्भावाची लक्षणे दिसून आली. परंतु त्याची चाचणी करण्यासाठी किट्सच नेपाळमध्ये उपलब्ध नव्हते. कोविड १९ विषाणूचे निदान करणाऱ्या चाचणीसाठी १७ हजार नेपाळी रुपये इतका खर्च लागतो. त्यामुळे त्या तरुणाचे नमुने सिंगापूरला पाठविले गेले जेथे त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली. लगेच त्याला क्वारंटाईन करण्यात आले. नंतर त्याला नऊ दिवस घरीच विलगीकरण करण्यास सांगण्यात आले. कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांची संख्या वाढत गेल्याने नेपाळ सरकारने पहिल्या टप्प्यात 100 टेस्टिंग कीट्सची खरेदी केली. यावरूनच नेपाळच्या आर्थिक परिस्थितीचे स्वरूप लक्षात येते.
अगोदरच आर्थिक निर्देशांकामध्ये पिछाडीवर असलेल्या नेपाळच्या सीमा कोरोनाचे उगमस्थान असलेल्या चीन आणि भारताला लागून असल्याने त्याचा मोठा फटका नेपाळला बसला आहे. पर्यटन हा नेपाळच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. माउंट एव्हरेस्टवरील पर्वतारोहण मोहिमेसाठी तसेच देशाच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी परदेशी पर्यटक नेपाळला जात असतात. मात्र साथीच्या रोगामुळे नेपाळला पर्यटक व्हिसा रद्द करावा लागला आहे. तसेच भारत-नेपाळ सीमाही बंद करावी लागली. लॉकडाउनची 24 मार्चपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लोकांच्या नोकर्या धोक्यात आहेत. गिर्यारोहक आणि त्यांना मदत करणारे काम नसल्याने निष्क्रिय आहेत. अगदी आपत्कालीन औषधे देखील भारत सरकार पुरवित आहे.